नांदेडात आता बाजारपेठ रात्री १० पर्यंत सुरू राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:20 AM2021-08-15T04:20:47+5:302021-08-15T04:20:47+5:30
शहर व जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालयातील कर्मचारी, बँक कर्मचारी, रेल्वे कर्मचारी, महापालिका कर्मचारी यांचे लसीकरण करणे आवश्यक आहे. ...
शहर व जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालयातील कर्मचारी, बँक कर्मचारी, रेल्वे कर्मचारी, महापालिका कर्मचारी यांचे लसीकरण करणे आवश्यक आहे. या कार्यालयांनी कर्मचाऱ्यांचे लसीकरण करणे बंधनकारक केले आहे. कार्यालये १०० टक्के क्षमतेने सुरू राहतील.
जिल्ह्यातील सर्व मैदाने, उद्याने विहित वेळेनुसार सुरू राहतील. लग्न सोहळ्यात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेचे पालन करणे गरजेचे आहे. मंगल कार्यालये, हॉटेल येथील आसन व्यवस्थेच्या ५० टक्के क्षमतेने उपस्थिती ठेवावी. १०० पेक्षा अधिक व्यक्ती असतील तर संबंधित मंगल कार्यालय, हॉटेलचा परवाना रद्द करण्याचा इशारा देण्यात आला आहे. मंगल कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण गरजेचे आहे.
गर्दी टाळण्यासाठी राजकीय, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम, निवडणूक सभा, रॅली, मोर्चे यावरील निर्बंध कायम आहेत. या सर्व नियम, अटींसह निर्बंध दूर करण्यात आले असले तरीही कोरोना नियमावलीचे पालन करणे बंधनकारक आहे. राज्यातील रुग्णसंख्या वाढल्यास व रुग्णांसाठी प्रतिदिन ७०० मेट्रिक टन त्यापेक्षा अधिक ऑक्सिजन लागत असल्यास संपूर्ण राज्यात लॉकडाऊन घोषित करून कठोर निर्बंध लागू करण्याचा इशाराही राज्य शासनाने दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात नागरिकांनी कोरोना नियमावलींचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.