अरेच्या, बँड बाजाच्या तालावर नाचत लग्नाचं वऱ्हाड चक्क स्मशानभूमीत पोहोचलं
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2024 06:28 PM2024-03-17T18:28:30+5:302024-03-17T18:29:01+5:30
देगलूर मध्ये प्रथमच स्मशानभूमीत रंगला विवाह सोहळा..
शब्बीर शेख/ देगलूर: एरव्ही स्मशानभूमी म्हटले की त्या ठिकाणी जळणारी चिता व नातेवाईकांचा आक्रोश असे गंभीर चित्र डोळ्यासमोर उभे राहते. मात्र यास अपवाद ठरत रविवार 17 मार्च रोजी देगलूर शहरातील स्मशानभूमीत चक्क विवाह सोहळा संपन्न झाला. यावेळी बँड बाजाच्या तालावर नाचनारे बाराती, भटजींच्या आवाजातील मंगलाष्टके, यासह जेवणाच्या पंक्ती असे काहीसे अनोखे व दुर्मिळ चित्र येथे पहावयास मिळाले.
देगलूर शहरातील वैकुंठ धाम स्मशानभूमीत मागील अनेक वर्षांपासून गोविंद व त्याची पत्नी सावित्रीबाई कोंडपेल्ली हे दाम्पत्य आपल्या चार मुली व एक मुलगा यांच्यासह स्मशानभूमीत वास्तव्यास असून या ठिकाणी मसनजोगी करून आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. त्यातच मागील दोन वर्षांपूर्वी गोविंद कोंडपेल्ली यांचे निधन झाल्याने चार मुली व एक मुलगा यांच्या पालन पोषणाची जबाबदारी आई सावित्रीबाई कोंडपेल्ली यांच्यावर येऊन ठेपली.मात्र परिस्थितीशी दोन हात करीत इतरांसाठी अशुभ मानली जाणारी स्मशानभूमी मात्र सावित्रीबाई यांच्यासाठी पोटापाण्याचा साधन बनली. याच ठिकाणी राहून मसनजोगी करीत सावित्रीबाईने आपली मोठी मुलगी लक्ष्मी याचे दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले व त्याच्या लग्नासाठी नात्यातीलच वराची निवड केली.अन विवाहाचे स्थळ मंगल कार्य किंवा अन्य ठिकाणी न ठेवता लग्न थेट स्मशान भूमीतच लावण्याचा निर्णय घेतला.
रविवार 17 मार्च रोजी शहरातील वैकुंठधाम स्मशानभूमी येथे जवळपास तीनशे ते चारशे वऱ्हाडींच्या उपस्थितीत सकाळच्या सुमारास हा लग्न सोहळा हिंदू रीती रिवाजाप्रमाणे अगदी थाटामाटात पार पडला. लक्ष्मी व आकाश यांच्या विवाह सोहळ्यासाठी स्मशान भूमीतच मांडव टाकण्यात आला होता.तर जवळपास पाचशे वऱ्हाड मंडळीसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. मसनजोगी म्हणून काम करणाऱ्या मातेने आपल्या कन्येचा विवाह सोहळा थेट स्मशानभूमीत लावत समाजात स्मशान भूमीबद्दल असलेली भीती व वेगवेगळे तर्क वितर्क यासह अंधश्रद्धेला फाटा देण्याचे काम केले आहे. आजही स्मशानभूमी म्हटले की आयुष्याच्या प्रवासाचे हे शेवटचे ठिकाण असल्याचे सांगितले जाते मात्र कोंडपेल्ली परिवाराने आपल्या मुलीच्या संसाराची नवीन सुरुवातच या ठिकाणाहून करत समाजाला एक प्रकारे अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेशच दिला आहे.
वधू वराकडील पाहुणे मंडळीसह आमदार जितेश अंतापुरकर,माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार,मुख्याधिकारी तानाजी चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष बालाजी टेकाळे, सुशील कुमार देगलूरकर, मारोती गायकवाड,डॉ शिकारे, पत्रकार श्याम वद्देवार, संजय हळदे,अनिल पवार, स्वच्छतेच्या जागरचे सूर्यकांत सुवर्णकार,सत्यनारायण नागोरी,विजय यन्नावार, सौ मीना सुवर्णकार, सौ मीना कोठारी, लक्ष्मण मलगिरवार,मार्तंड वनंजे यांच्यासह अनेक मान्यवरांनी या अनोख्या लग्न सोहळ्यास उपस्थित राहून अंधश्रद्धेला फाटा देणाऱ्या या उपक्रमाचे स्वागत केले.तर आपल्या आयुष्याची सुरुवात आकाश आणि लक्ष्मीने थेट स्मशानभूमीतून केल्याने या विवाह सोहळ्याचा आनंद दोन्ही कुटुंबीया सहित वर व वधूच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे झळकत असल्याचे दिसून येत होते.