इंधन दरवाढीविरोधात पालकमंत्री चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नांदेडमध्ये भव्य बैलगाडी, सायकल मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:14 AM2021-07-16T04:14:12+5:302021-07-16T04:14:12+5:30

शहरातील जुना मोंढा ते महात्मा गांधी पुतळा या दरम्यान गुरुवारी काँग्रेसच्या वतीने इंधन दरवाढीविरोधात बैलगाडी व सायकल मोर्चा काढला ...

Massive bullock cart, cycle march in Nanded under the leadership of Guardian Minister Chavan against fuel price hike | इंधन दरवाढीविरोधात पालकमंत्री चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नांदेडमध्ये भव्य बैलगाडी, सायकल मोर्चा

इंधन दरवाढीविरोधात पालकमंत्री चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नांदेडमध्ये भव्य बैलगाडी, सायकल मोर्चा

Next

शहरातील जुना मोंढा ते महात्मा गांधी पुतळा या दरम्यान गुरुवारी काँग्रेसच्या वतीने इंधन दरवाढीविरोधात बैलगाडी व सायकल मोर्चा काढला होता. या मोर्चाचे नेतृत्व पालकमंत्री चव्हाण यांनी केले. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते म्हणाले, देशामध्ये सामान्य माणसांच्या विरोधात निर्णय घेतले जात आहेत. संसदेमध्ये शेतकरी विरोधी कायदे मंजूर केले. या कायद्यांना शेतकऱ्यांचा विरोध आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करणारे कायदे आगामी विधिमंडळाच्या अधिवेशनात संमत करून घेणार आहे. केंद्र सरकारने १०२ व्या घटना दुरुस्तीनुसार आरक्षणाची मर्यादा ५० टक्‍क्‍यांपर्यंत सीमित केली आहे. मराठा, धनगर, मुस्लिम, ओबीसी यांना जर न्याय द्यायचा असेल, तर केंद्र सरकारने घटना दुरुस्ती करून या समाजाला आरक्षण दिले पाहिजे. जर त्यांना शक्य नसेल तर त्यांनी हे अधिकार राज्य सरकारांना प्रदान करावेत. महाराष्ट्रात आम्ही त्यानंतर मराठा समाजाला आरक्षण देऊन दाखवू. माझे जिल्ह्यातील सहकारी माजी खासदार सुभाष वानखेडे असो किंवा मोहन हंबर्डे असो, डी. पी. सावंत असो, अमरनाथ राजूरकर असो, यांनी लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी रस्त्यावर आंदोलन करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका वठविली आहे. कार्यकर्त्यांत जाऊन घोषणाबाजी करणारे वानखेडे यांनी लोकांसाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी दाखविली.

यावेळी विधान परिषद प्रतोद आ. अमरनाथ राजूरकर, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, माजी खा. सुभाष वानखेडे, आ. मोहन हंबर्डे यांनी त्यांच्या भाषणातून केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणाच्या विरोधात टीका केली.

या मोर्चामध्ये जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, जि. प. अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, महापौर मोहिनीताई येवनकर, उपमहापौर मसुद खान, स्थाई समिती सभापती वीरेंद्रसिंग गाडीवाले, माजी महापौर अब्दुल सत्तार, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पप्पू कोंडेकर, शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे, ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किशोर स्वामी, विनोद कांचनगिरे, युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष अब्दुल गफार, सत्यजित भोसले यांच्यासह काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष, मनपा नगरसेवक, जि. प. सदस्य, जिल्ह्यातील विविध नगरपालिकांचे नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, नगरसेवक, काँग्रेस पक्षाच्या विविध फ्रंटचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Massive bullock cart, cycle march in Nanded under the leadership of Guardian Minister Chavan against fuel price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.