नांदेडात शॉर्टसर्किटनंतर गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट; दीड किलोमीटरपर्यंतचा परिसर हादरला
By रामेश्वर बालाजीराव काकडे | Published: January 20, 2024 12:12 PM2024-01-20T12:12:32+5:302024-01-20T12:12:59+5:30
स्फोट एवढा भीषण होता की स्टोअर रुमवरील टीनपत्रे तोडून सिलिंडरचा चकनाचूर झाला.
नांदेड : शॉर्टसर्किट झाल्याने घरातील स्टोअर रुमला आग लागली. या आगीत स्टोअर रुममध्ये ठेवलेल्या गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. ही घटना शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या दरम्यान नांदेड शहरातील सरपंच नगर पाटीजवळ घडली.
सरपंच नगर येथे नरेश दरबस्तवार यांचे घर आहे. घरामध्ये वडील व मुलगा दोघेजण खालच्या रुममध्ये होते. पण सदर आग घराच्या वरच्या मजल्यावर लागल्याने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण घरातील साहित्याचे नुकसान झाले आहे. स्टोअर रुम तिसऱ्या मजल्यावर असून यामध्ये बैलाचे कासरे व इतर दुकानातील साहित्य ठेवलेले होते. याच ठिकाणी भरलेला सिलिंडरही होता. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने त्याचा धूर निघून त्यानंतर काही वेळाने त्याचा स्फोट झाला. स्फोट एवढा भीषण होता की स्टोअर रुमवरील टीनपत्रे तोडून सिलिंडरचा चकनाचूर झाला.
स्फोटाचा आवाज परिसरात एक ते दीड कि.मी. पर्यंत ऐकायला मिळाला
आवाज मोठा असल्याने परिसरातील नागरिक झोपेतून जागे झाले. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. काही वेळात अग्नीशमन दलही येथे दाखल झाले. अर्ध्या तासाच्या परिश्रमानंतर आग आटोक्यात आणली. यावेळी भाग्यनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सूर्यमोहन बोलमवाड, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी सिंगनवाड यांनीही धाव घेत आगीवर नियंत्रणासाठी प्रयत्न केले. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले होते.