संकट काळात मातोश्रीची माया; भाजपाचे कमळ सोडले अन् हाती बांधले पुन्हा शिवबंधन
By शिवराज बिचेवार | Published: May 17, 2023 06:26 PM2023-05-17T18:26:22+5:302023-05-17T18:28:45+5:30
कमळ हाती घेतलेल्या पूर्वाश्रमीच्या सैनिकांना भाजप नेत्यांनी वाऱ्यावर सोडले, पुन्हा बांधले शिवबंधन
नांदेड- शिवसेनेला जय महाराष्ट्र करुन भाजपात गेलेल्या दोन शिवसैनिकांच्या संकटाच्या काळात मातोश्रीच मदतीला धावली होती. मातोश्रीचे हे ऋण कधीही विसरता येणार नाहीत, याची जाणीव ठेवून दोघांनीही बुधवारी कमळ सोडून मशाल हाती घेतली. मातोश्रीवर या दोघांचेही जल्लोषात स्वागत करण्यात आले.
२०१२ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असताना महागाईच्या मुद्यावरुन तत्कालीन आमदार अनुसया खेडकर यांच्या नेतृत्वाखाली हिंगोली गेट येथे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर पोलिसांनी १९ जणांवर सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला होता. या प्रकरणात १२ एप्रिल रोजी न्यायालयाने आरोपी शिवसैनिकांना पाच वर्षाची कैद आणि प्रत्येकी १ लाख ६० हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. त्यामध्ये भाजपात असलेले जिल्हा उपाध्यक्ष संदीप छपरवाल आणि शहर चिटणीस मनोज यादव यांचाही समावेश होता.
या सर्वांची रवानगी तुरुंगात करण्यात आली होती. परंतु तुरुंगात गेलेल्या अनेकांची दंड भरण्याचीही आर्थिक परिस्थिती नव्हती. त्यामुळे मातोश्री त्यांच्या दंडाची रक्कम भरली. विशेष म्हणजे भाजपाच्या पदाधिकार्यांच्या मदतीला मात्र कुणीही धावून आले नाही. त्यामुळे ते भाजपात गेले असले तरी, ते पूर्वाश्रमीचे सैनिक होते या भावनेतून मातोश्रीने त्यांच्याही दंडाची रक्कम भरली होती. त्याची जाणीव ठेवून या दोघांनीही बुधवारी ठाकरे गटात प्रवेश केला.
भाजप नेत्यांवर सडकून टिका
संकटात असताना भाजपच्या एका नेत्यानेही या दोघांची विचारपूस केली नव्हती. उलट ठाकरे गट मात्र धावून आला. त्यामुळे दोघांनीही तुरुंगाच्या बाहेर येताच सोशल मिडीयावर भाजपच्या नेत्यांवर सडकून टिका करीत आपली आगामी भूमिका स्पष्ट केली होती.