बंडखोरी शमविण्याचे आव्हान; भोकरमध्ये सर्वाधिक १६७ उमेदवार, अपक्षांचा वाढता 'भाव'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2024 11:54 AM2024-11-01T11:54:36+5:302024-11-01T11:58:34+5:30
भोकरमध्ये माजी मुख्यमंत्री अशाेकराव चव्हाण यांची कन्या श्रीजया निवडणूक रिंगणात असल्याने अपक्ष उमेदवार चांगलाच भाव खात आहेत.
नांदेड : जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी दाखल करणाऱ्यांची संख्या या निवडणुकीत वाढली आहे. परंतु, चार दिवसांत कोण कुणाच्या गळाला लागतो अन् उमेदवारी मागे घेतो याचा अंदाज बांधून ज्या त्या उमेदवारांचे कार्यकर्ते कामाला लागले आहे. अंधाऱ्या रात्री बैठकांचे सत्र सुरू असून जातनिहाय, पक्षनिहाय अपक्षांचा भाव निघाला असून भोकर विधानसभा मतदार संघातील अपक्षांचा उमेदवारी मागे घेण्यासाठीचा 'आकडा' दिवसेंदिवस वाढतो आहे.
नांदेड जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघापैकी सर्वाधिक १६७ जणांनी भोकर विधानसभा मतदार संघातून उमेदवारी दाखल केली आहे. या ठिकाणी माजी मुख्यमंत्री अशाेकराव चव्हाण यांची कन्या श्रीजया निवडणूक रिंगणात असल्याने अपक्ष उमेदवार चांगलाच भाव खात आहेत. त्याचबरोबर लोहा आणि नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघात आघाडीत बिघाडी झाल्याने दोन्ही पक्षाचे उमेदवार वरिष्ठ नेत्यांना आपल्यासाठीच सभा, बैठका घेण्याचा आग्रह धरत आहेत. त्याचबरोबर आघाडी आणि महायुतीतील घटक पक्षातील इच्छुकांनी अपक्ष उमेदवारी दाखल करत स्वकियांनाच आव्हान दिले आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी कशा पद्धतीने मागे घेता येईल, यासाठीचे गणित बांधले जात असून त्यासाठी बंडखोरांच्या गॉडफादरपर्यंत अधिकृत उमेदवार अन् त्यांचे निकटवर्तीय तन, मन, धनाने संपर्क साधत आहेत. अपक्षांपैकी कोण माघारी घेणार अन् कोण प्रत्यक्षात मैदानात राहणार? यावर विजयाचे गणित अवलंबून आहे.