नांदेड महापौर निवडीसाठी १ जूनचा मुहूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 01:02 AM2019-05-30T01:02:59+5:302019-05-30T01:03:48+5:30
महापालिकेच्या महापौर शिला भवरे यांनी राजीनामा दिल्यानंतर नव्या महापौर निवडीकडे लक्ष लागले आहे. नवीन महापौरांच्या निवडीसाठी १ जूनचा मुहूर्त ठरला असून पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांना प्राधिकृत करण्यात आले आहे़
नांदेड : महापालिकेच्या महापौर शिला भवरे यांनी राजीनामा दिल्यानंतर नव्या महापौर निवडीकडे लक्ष लागले आहे. नवीन महापौरांच्या निवडीसाठी १ जूनचा मुहूर्त ठरला असून पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांना प्राधिकृत करण्यात आले आहे़
२२ मे रोजी भवरे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्याच दिवशी नगरसचिव विभागाने विभागीय आयुक्तांना याबाबत माहिती दिली आहे. महापालिकेच्या महापौरपदी १ नोव्हेंबर २०१८ रोजी निवड झाल्यानंतर १७ महिन्याच्या कालावधीत महापौर शिला भवरे यांनी शहरातील राजर्षी शाहू महाराज आणि सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा विषय मार्गी लावला. गेल्या अनेक वर्षापासून या दोन्ही पुतळ्यांचे काम रखडले होते. आयुक्त लहुराज माळी यांनी या विषयाला हातात घेतल्यानंतर महापौर शिला भवरे यांनीही पाठपुरावा सुरू ठेवला. त्यामुळे शहरात हे पुतळे दिमाखदारपणे उभे राहिले.
काँग्रेसच्या सव्वा वर्षाच्या फार्मूल्यानुसार महापौर शिलाताई भवरे आणि उपमहापौर विनय गिरडे यांच्या राजीनाम्याची मागणी काँग्रेस नगरसेवकातूनच करण्यात आली. मात्र लोकसभा निवडणूक पाहता काँग्रेसने महापौर भवरे यांना लोकसभा निवडणुकीचे मतदान होईपर्यंत पदावर कायम ठेवले. मतमोजणीच्या एक दिवस अगोदरच म्हणजेच २२ मे रोजी पाणीटंचाई विषयावर झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत महापौर शिलाताई भवरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यावेळी उपमहापौर विनय गिरडे यांना अभय देण्यात आले. त्यांना राजीनामा देण्याचे सांगण्यात आले नाही. परिणामी ते पदावर कायम राहिले आहेत. महापौर पदाच्या रिक्ततेबाबत नगरसचिव विभागाने २२ मे रोजीच विभागीय आयुक्तांना अहवाल सादर केला आहे.दरम्यान, महापौर निवडीचा कार्यक्रम १ जून रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. त्यामुळे एकूणच नव्या महापौर निवडीकडे लक्ष लागले आहे.
महापौर पदासाठी आता इच्छुकांची संख्या मोठी असली तरीही लोकसभेच्या निकालामुळे ते इच्छुक आता समोर येण्यास धजावत नसल्याचे चित्र आहे. महापालिकेत अपेक्षेपेक्षा जास्त नगरसेवक निवडून आले. काँग्रेसची एकहाती सता महापालिकेवर आली. मात्र शहरात आवश्यक ती कामे पूर्ण झाली नाही. परिणामी शहरवासीयांच्या रोषाचा सामना काँग्रेसला करावा लागला. लोकसभा निवडणुकीत अनपेक्षित असा निकाल आला. संपूर्ण देशासह नांदेडमध्येही काँग्रेसला पराभव पत्करावा लागला. या पार्श्वभूमीवर नांदेड महापालिकेच्या महापौर पदाची धुरा आता कोणाच्या हाती सोपवली जाईल याकडे लक्ष लागले आहे.
शहरात लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने मिळवलेली मते महापौर पदासाठी इच्छुक असलेल्या नगरसेवकांसाठी डोकेदुखी ठरली आहे. अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी महापौर पद हे राखीव आहे. इच्छुक नगरसेविकांच्या प्रभागात वंचित आघाडीने लक्षणीय मते मिळवली आहेत. त्यामुळे आता पद मागायचे तरी कसे? असा प्रश्न इच्छुकांपुढे उभा राहिला आहे. काँग्रेस श्रेष्ठींकडून आता महापौर पदाचा काटेरी मुकुट कोणाच्या डोक्यावर चढवला जातो याकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
५ जणांनी घेतले नामनिर्देशनपत्र
नवीन महापौरांची निवड १ जून रोजी सकाळी ११ वाजता होार आहे़ यासाठी पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांना प्राधिकृत करण्यात आले आहे़ याबाबतचे आदेश विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी २८ मे रोजी काढले आहेत़ या निवडणुकीचा कार्यक्रम नगरसचिव विभागातर्फे तयार होईल आणि त्यानुसार प्रक्रिया पार पडेले़
महापौर पदासाठी बुधवारी पूजा पवळे, ज्योती रायबोले, दीक्षा धबाले, ज्योती कदम, बेबी गुपिले यांनी नामनिर्देशनपत्र घेतले. दरम्यान, महापौरपदी कोण विराजमान होणार? याचा अंतिम निर्णय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण हेच घेतील़