वैद्यकीय अधिकारी व्हेंटिलेटरवर...
By admin | Published: March 2, 2015 01:31 PM2015-03-02T13:31:48+5:302015-03-02T13:31:48+5:30
आपत्कालीन वैद्यकीय सेवा १0८ चा राज्यभर बोलबाला होत असून एकट्या नांदेड जिल्ह्यात गत वर्षभरात या सेवेद्वारे २0 हजारांहून अधिक रुग्णांना सेवा दिली आहे.
Next
>नांदेड : आपत्कालीन वैद्यकीय सेवा १0८ चा राज्यभर बोलबाला होत असून एकट्या नांदेड जिल्ह्यात गत वर्षभरात या सेवेद्वारे २0 हजारांहून अधिक रुग्णांना सेवा दिली आहे. तर राज्यात हा आकडा तब्बल दोन लाखांवर जातो. असे असताना या सेवेसाठी परिश्रम घेणार्या राज्यातील तीन हजारांवर वैद्यकीय अधिकार्यांना दहा हजारांचे नाममात्र वेतन देवून बोळवणूक करण्यात येत आहे.
शासनाने पीपीपी तत्वावर १0८ ही सेवा सुरु केली. या सेवेला पुढील महिन्यात एक वर्ष पूर्ण होत आहे. कुठेही अपघात झाला की, १0८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधला जात आहे. पंधरा मिनिटांच्या आत अपघातस्थळी सदरील रुग्णवाहिका दाखल होत असून त्याद्वारे अनेकांचे प्राण वाचले आहेत. त्याचबरोबर अनेक गर्भवतींच्या प्रसूतीही या अँम्बुलन्समध्ये करण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागात तर ही सेवा जीवनदायिनी ठरत आहे. असे असताना ही सेवा देणार्या वैद्यकीय अधिकार्यांच्या मागण्यांकडे मात्र बीव्हीजी ही कंपनी साफ दुर्लक्ष करीत आहे. वेतनवाढीचा मुद्दा उपस्थित केल्यास सेवेतून कमी करण्याचा दम भरला जात आहे. त्यामुळे रुग्णांना जीवनदान देणारे या सेवेतील वैद्यकीय अधिकारीच सध्या व्हेंटिलेटरवर आहेत. याबाबत वैद्यकीय अधिकारी विभागीय व्यवस्थापक डॉ. गजानन पुराणिक यांच्यापुढेही गार्हाणे मांडले. परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही.
किमान २५ हजार रुपये वेतन, वैद्यकीय अधिकारी व पायलट यांचा २५ लाखांचा विमा, या सेवेचा प्रोटोकॉल, वेतनाची पावती आदी अनेक मागण्यांसाठी गेल्या वर्षभरापासून हे वैद्यकीय अधिकारी झगडत आहेत. त्यामुळे या वैद्यकीय अधिकार्यांनी आता राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे. याबाबत वैद्यकीय अधिकार्यांची बैठक झाली असून बैठकीला जिल्हाध्यक्ष डॉ. प्रशांत मेरगेवाड, डॉ. चंद्रकांत थोटे, डॉ. विजय मसलगेकर, सुनील मंगनाळे, डॉ. धनंजय देवमाने, डॉ. पाईकराव, डॉ. जीवने, डॉ. उमरेकर, डॉ. सुनील जाधव, डॉ. नरवाडे, डॉ. भाटापूरकर, डॉ. पद्माकर पाटील, डॉ. मिरासे, डॉ. उमेश जाधव, डॉ. खानजोडे यांची उपस्थिती होती. /(प्रतिनिधी)
आपत्कालीन सेवेअंतर्गत राज्यभरात ९२६ अँम्बुलन्स आहेत. तर जिल्ह्यात २५ आहेत. प्रत्येकी ३ कर्मचारी याप्रमाणे ३000 डॉक्टर या सेवेसाठी कार्यरत आहेत. तर चालकांची संख्या १८00 एवढी आहे. त्यासाठी शासनाकडून कोट्यवधींचा निधीही येतो. परंतु प्रत्यक्ष कराराबाबत वैद्यकीय अधिकार्यांनाही अंधारात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे वेतन किती असावे, याबाबत सर्व गोंधळ आहे.