मेडिकल विद्यार्थ्यांनो, बाँड सेवा करा किंवा १० लाख भरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:17 AM2021-04-21T04:17:58+5:302021-04-21T04:17:58+5:30
मागील वर्षीपासून कोरोनामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ही भीती अधिकच वाढली आहे. दररोज कोरोना रुग्णांची संख्या ...
मागील वर्षीपासून कोरोनामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ही भीती अधिकच वाढली आहे. दररोज कोरोना रुग्णांची संख्या व मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने देशभरात हाहाकार उडाला आहे. वैद्यकीय सेवा वेळेवर मिळत नसल्याने अनेकांचा मृत्यू होत आहे. काही ठिकाणी सुविधा आहे. मात्र वैद्यकीय अधिकारी नाहीत, तर काही ठिकाणी वैद्यकीय अधिकारी असून कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही. विशेषत: ग्रामीण भागात कोरोनाने आता जाळे पसरले असून या ठिकाणी कोणतीही यंत्रणा सक्षम नाही. त्यामुळे रुग्ण शहराकडे धाव घेत आहेत. ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन आता वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने यावर्षी एमबीबीएस उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात सेवा देणे बंधनकारक केले आहे. अन्यथा या सेवेपासून दूर राहायचे असेल तर १० लाख रुपये भरण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे आता नांदेडच्या वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या दीडशे विद्यार्थ्यांना सेवा करावी लागणार आहे.
प्रतिक्रिया-
यावर्षी एमबीबीएस झालेल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय सेवा देणे बंधनकारक केले असून त्यादृष्टीने विद्यार्थ्यांना सूचना पण देण्यात आल्या आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात जाऊन आपली सेवा देणे गरजेचे आहे आणि विद्यार्थी त्यादृष्टीने सेवा देतील.
- डॉ. अमोल राठोड, नांदेड.
प्रतिक्रया- यापूर्वी पासूनच एमबीबीएस झालेल्या विद्यार्थ्यांना दोन वर्षांची सेवा देणे बंधनकारक आहे; परंतु काही विद्यार्थी पैसे भरून सवलत घेत असत. मात्र, यावर्षी ही सेवा सर्वांना बंधनकारक केली आहे. मात्र, ज्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी जायचे असेल तर त्यांना नंतरही ही सेवा देता येते.
- डॉ. चैताली चव्हाण, नांदेड.
प्रतिक्रिया- वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने यावर्षी एमबीबीएस उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात सेवा देणे बंधनकारक केले असून या सेवेपासून दूर राहायचे असेल तर १० लाख रुपये भरावे लागणार आहेत. विद्यार्थ्यांना सेवा करावी लागणार आहे. अशा कठीण काळात ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा देणे खूप गरजेचे झाले आहे.
- डॉ. नितीन जाधव, नांदेड.