‘दवा’ नाही मृत्यूचा ‘खाना’; नांदेड, छत्रपती संभाजीनगरमध्ये आरोग्य व्यवस्थेचे निघाले धिंडवडे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 04:56 AM2023-10-03T04:56:57+5:302023-10-03T04:57:16+5:30

२४ तासांत तब्बल ३४ रुग्णांना जीव गमवावा लागल्याचे भयाण वास्तव समोर आले आहे.

'Medicine' not 'food' of death; In Nanded, Chhatrapati Sambhajinagar, the health system is in shambles | ‘दवा’ नाही मृत्यूचा ‘खाना’; नांदेड, छत्रपती संभाजीनगरमध्ये आरोग्य व्यवस्थेचे निघाले धिंडवडे

‘दवा’ नाही मृत्यूचा ‘खाना’; नांदेड, छत्रपती संभाजीनगरमध्ये आरोग्य व्यवस्थेचे निघाले धिंडवडे

googlenewsNext

शिवराज बिचेवार/संतोष हिरेमठ

नांदेड/ छत्रपती संभाजीनगर : ‘हाफकिन’ने औषध खरेदीचा गोंधळ घातल्यानंतर राज्यभरातील शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. अत्यवस्थ रुग्णांनाही वेळेत औषधे न मिळाल्याने मराठवाड्यात गेल्या २४ तासांत तब्बल ३४ रुग्णांना जीव गमवावा लागल्याचे भयाण वास्तव समोर आले आहे.

 नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गेल्या २४ तासांत रुग्णालयात दर तासाला एक म्हणजेच २४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गंभीर बाब म्हणजे मृतांमध्ये १२ नवजात बालकांचा समावेश आहे. तर छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयात दोन बालकांसह १० जणांचा मृत्यू झाला आहे.     

‘हाफकिन’ने औषध खरेदी करून न दिल्याने गोरगरिबांचा मोठा आधार असलेल्या शासकीय रुग्णालयांना औषधांचा पुरवठाच करण्यात आलेला नाही. त्यामुळे राज्यभरातील रुग्णालयांमध्ये सध्या औषधांचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे.

नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नांदेडसह हिंगोली, परभणी, यवतमाळ, वाशिम अन् शेजारील तेलंगणा राज्यातून मोठ्या प्रमाणात रुग्ण येतात. रुग्णांची संख्या वाढत असताना औषधांच्या तुटवड्याचा विषयही गंभीर होत चालला आहे. आजही रुग्णांना बाहेरून औषधे आणण्याचा सल्ला दिला जातो. त्यातच गेल्या २४ तासांत रुग्णालयात २४ जणांचा मृत्यू झाला असून, ६ पुरुष आणि ६ स्त्रीजातीच्या नवजात बालकांचा समावेश आहे; परंतु रुग्णालय प्रशासन मात्र अत्यवस्थ असलेल्या अन् शेवटच्या क्षणी रेफर रुग्णांचा मयतांमध्ये समावेश असल्याचा दावा करीत आहे.

आणखी ७० रुग्ण अत्यवस्थ

शासकीय रुग्णालयात २४ रुग्णांचा झालेला मृत्यू ही गंभीर बाब आहे. त्यात आणखी ७० रुग्ण अत्यवस्थ असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. हे रुग्ण वेगवेगळ्या गावातून आणि शहरातील खासगी रुग्णालयातून रेफर झालेले आहेत.  शहरातील खासगी डॉक्टरांना शासकीय रुग्णालयात येऊन सेवा देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. डॉक्टरांची कमतरता, नर्सिंग स्टाफच्या झालेल्या बदल्या, अपुरा निधी यामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. देखभाल अन् दुरुस्तीसाठी पैसेही न मिळाल्याने सीटी स्कॅन मशीनही बंद आहे, अशी माहिती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.

खरेदी तांत्रिक मान्यतेत अडकली, कोण जबाबदार?

जिल्हा नियोजन समितीकडून रुग्णालयासाठी ४ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यातील १ कोटी रुपयांत यंत्रसामग्री, १ कोटीची औषध खरेदी, १ कोटी शस्त्रक्रियेसाठी लागणारे साहित्य आणि उर्वरित १ कोटी ऑक्सिजन प्लँटसाठी ठेवण्यात आले आहेत; परंतु प्रस्तावाला अद्याप तांत्रिक मान्यता मिळाली नाही.

एक्स्पायरी डेट संपतेय, आमच्याकडे द्या पाठवून

रुग्णालयात अत्यावश्यक औषधे नसल्यामुळे शेजारील जिल्ह्याच्या रुग्णालयात एक्स्पायरी डेट संपत असलेल्या औषधांचा साठा गरज पडल्यास मागवून घेण्यात येत आहे.  

तीन फार्मा कंपन्यांचे सव्वादोन कोटी थकीत

कोरोनाकाळात स्थानिक पातळीवर औषध खरेदीचे अधिकार देण्यात आले होते. त्या काळात वैद्यकीय महाविद्यालयाने तीन फार्मा कंपन्यांकडून २ कोटी १६ लाख रुपयांची औषध खरेदी केली हाेती. परंतु, तीन वर्षांनंतरही त्यांची बिले अदा करण्यात आली नाहीत. त्यामुळे त्यांनीही औषधी दिली नाहीत.

चौकशी समिती आज नांदेडात

शासकीय रुग्णालयात २४ तासांत २४ रुग्णांचे मृत्यू झाल्याच्या प्रकरणाची शासनाने गंभीर दखल घेतली असून मंगळवारी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयातील डॉ. भारत चव्हाण, डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य आणि बालरोग तज्ज्ञ डॉ. जोशी या तिघांची चौकशी समिती नांदेडात येणार आहे.

नेत्यांचे आरोपांचे डोस, सरकारचे कारवाईचे निदान; तीन फार्मा कंपन्यांचे सव्वादोन कोटी थकीत

दुर्घटनेबाबत सविस्तर माहिती घेतली जाईल. त्यावर जे काही उपाय आहेत ते करणार आणि घटनेची सविस्तर चौकशी करणार.

              - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

नांदेडमध्ये घडलेली घटना अत्यंत दुःखद आहे. ठाण्यात झालेल्या घटनेने सरकार आणि सरकारी यंत्रणा काहीही शिकलेली नाही. १२ नवजात मुलांचा मृत्यू हा एका अर्थाने सरकारी अनास्थेचा बळी आहे. या घटनेला जबाबदार असलेल्यांवर सरकारने लगोलग कारवाई करावी.

- अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

नक्की काय प्रकरण आहे हे चौकशी केल्याशिवाय समजणार नाही. आयुक्त आणि संचालक माहिती घेत आहेत. मी उद्या जाणार आहे. आवश्यक असेल तर चौकशी समिती नेमून तत्काळ कारवाई करू.

- हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षणमंत्री

राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरोग्य यंत्रणेचे धिंडवडे निघाले आहेत. या मृत्यूंना शासन जबाबदार आहे. ठाण्यामधील घटना ताजी असताना ही घटना घडली आहे. या मागची कारणे गंभीर आहेत. नांदेडच्या रुग्णालयात पूर्णवेळ डीन नाही. अनेक पदे रिक्त आहेत. औषध पुरवठा पुरेसा होत नाही. रुग्णांची वेळेवर तपासणी होत नाही.

- विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते, विधानसभा 

रुग्णांना वेळेवर औषध पुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांना जीव गमवावा लागला, अशी प्राथमिक माहिती मिळते आहे. जितकी कार्यक्षमता स्वतःच्या प्रचारासाठी, विरोधी पक्ष फोडण्यासाठी वापरता, तितकी कार्यक्षमता जर कामाप्रती दाखवली असती तर ही परिस्थिती आली नसती. सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे आज अनेक आयांनी आपली लेकरे गमावली आहेत. त्यांच्या अश्रूंची किंमत सरकारला मोजावी लागेल.

- जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

कोरोनाकाळात स्थानिक पातळीवर औषध खरेदीचे अधिकार देण्यात आले होते. त्या काळात वैद्यकीय महाविद्यालयाने तीन फार्मा कंपन्यांकडून २ कोटी १६ लाख रुपयांची औषध खरेदी केली हाेती. परंतु, तीन वर्षांनंतरही त्यांची बिले अदा करण्यात आली नाहीत. त्यामुळे त्यांनीही औषधी दिली नाहीत.

चौकशी समिती आज नांदेडात

शासकीय रुग्णालयात २४ तासांत २४ रुग्णांचे मृत्यू झाल्याच्या प्रकरणाची शासनाने गंभीर दखल घेतली असून मंगळवारी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयातील डॉ. भारत चव्हाण, डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य आणि बालरोग तज्ज्ञ डॉ. जोशी या तिघांची चौकशी समिती नांदेडात येणार आहे.

Web Title: 'Medicine' not 'food' of death; In Nanded, Chhatrapati Sambhajinagar, the health system is in shambles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nandedनांदेड