किनवट नपच्या अध्यक्षांविरुद्ध असलेल्या नगरसेवकांची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:17 AM2020-12-22T04:17:37+5:302020-12-22T04:17:37+5:30
किनवट : आपसातील मतभेद बाजूला ठेवून विकास कामे करा. यापुढे सर्वांनी एकत्र येऊन कामे करण्याच्या सूचना आ.भीमराव केराम यांनी ...
किनवट : आपसातील मतभेद बाजूला ठेवून विकास कामे करा. यापुढे सर्वांनी एकत्र येऊन कामे करण्याच्या सूचना आ.भीमराव केराम यांनी सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांना रविवारी रात्री बैठक घेऊन दिल्या. गेल्या काही दिवसांपासून नगराध्यक्षांविरुद्ध काही भाजपच्या असंतुष्ट नगरसेवकांत धुसफूस सुरू होती. एकदोनदा आमदारांनी हस्तक्षेप केला पण धुसफूस सुरूच होती. आता रविवारी आमदारांनी चांगलाच खरपूस समाचार घेतल्याने धुसफूस थांबेल की छुप्या रीतीने सुरू राहील हे काळच सांगेल.
किनवट नगरपालिकेवर गेल्या काही वर्षांनंतर भाजपची एकहाती सत्ता स्थापन झाली. दोन अडीच वर्षे गुण्यागोविंदाने नगरपरिषदेचा कारभार सुरू होता. मात्र गेल्या पाच सहा महिन्यांपासून सत्ताधारी भाजपच्या काही नगरसेवकांनी नगराध्यक्षांविरुद्ध अप्रत्यक्ष बंड सुरू झाले होते. ही धुसफूस शहरात चर्चेचा विषय बनली तेव्हा ऐन दिवाळीच्या काळात आ. केराम यांनी हस्तक्षेप केला आणि धुसफूस थंडावली होती. आता पुन्हा ही धुसफूस सुरू झाल्याने सत्ताधारी भाजपच्या सर्व नगरसेवकांना शहरालगतच्या एका फार्महाऊसवर बोलावून सर्वांचा खरपूस समाचार घेऊन तंबी दिली. यापुढे आपसातील मतभेद दूर करून विकासाची कामे करा अशा सूचना त्यांनी देऊन धुसफूस कमी केली आहे. मात्र ही धुसफूस शमेल की छुप्या रीतीने सुरू राहील? हे काळच सांगेल.
याबाबत एका नगरसेवकाने नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली. या बैठकीने नगराध्यक्षांना बळ मिळाले असून आ.केराम जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल हेच या बैठकीत दिसून आले आहे.