संभाव्य टंचाई आराखडा करण्यासाठी आज बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 12:06 AM2018-11-15T00:06:35+5:302018-11-15T00:07:04+5:30
शासनाची उदासीनता आहे की प्रशासनाची ? याबाबतचे गूढ कायम आहे़ गतवर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस पडला होता़ टंचाईचे चित्र सर्वत्र निर्माण झाल्याने संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी टंचाई कृती आराखडा तयार करून तो जिल्हा प्रशासनाकडे पाठविला़ त्याला मंजुरीही मिळाली़
किनवट : किनवट तालुका संभाव्य टंचाई आराखडा तयार करण्यासाठी व टंचाई गावे निश्चित करण्यासाठी १५ नोव्हेेंबर रोजी टंचाई पूर्वबैठक बोलावण्यात आली आहे़ मात्र गतवर्षीचे टंचाई काळात राबवलेल्या मंजूर आराखड्ड्यातील झालेल्या कामांचे पैसे अद्यापही मिळाले नाहीत़ त्यामुळे शासनाची उदासीनता आहे की प्रशासनाची ? याबाबतचे गूढ कायम आहे़
गतवर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस पडला होता़ टंचाईचे चित्र सर्वत्र निर्माण झाल्याने संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी टंचाई कृती आराखडा तयार करून तो जिल्हा प्रशासनाकडे पाठविला़ त्याला मंजुरीही मिळाली़ संबंधित विभागाने टंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना राबविल्या़ १९१ गावे, १०५ वाडीतांडे असलेल्या किनवट तालुक्यात गतवर्षी ९५ गावांत १०२ विहिरी अधिग्रहणाचे काम करण्यात आले़ त्यातून केवळ सात लक्ष रुपयांची बोळवण करण्यात आली़ अद्यापही ३४ लक्ष रुपये येणे शिल्लक असल्याची माहिती आहे़
याशिवाय जि़ प़ च्या पाणी पुरवठा विभागाने गतवर्षी टंचाई काळात मंजूर आराखड्यानुसार टंचाईग्रस्त गावांत नळयोजनेची विशेष दुरुस्ती, पूरक नळयोजना ही कामे केली़ झालेल्या कामांचे पैसे अद्यापही संबंधितांना मिळाले नसल्याने यंदा काम करायला ही यंत्रणा पुढे येईल का ? याबाबत साशंकताच आहे़
दरवर्षी टंचाईपूर्व बैठका घेतल्या जातात़ जानेवारी ते मार्च व एप्रिल ते जून हा टंचाई कृती आराखडा तयार केला जातो़ त्याला मंजुरीही मिळते़ मात्र उपाययोजना राबवूनही केलेल्या कामाचा मावेजा वेळेवर मिळत नाही़ आराखडा मंजूर असतानाही कामे मात्र पावसाळ्याच्या तोंडावर केली जातात़ टंचाईग्रस्त गावकऱ्यांना मात्र पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागतात़ मंजूर आराखड्यातील कामे पूर्ण होऊनही मंजूर निधी देण्यात शासनाची उदासीनता की प्रशासनाची, हे कळायला मार्ग नाही़ यावर्षीही पावसाळ्यात धरसोड पद्धतीने पाऊस झाल्याने विशेषत: इस्लापूर शिवणी व जलधारा या तीन मंडळात पन्नास टक्क्यांच्या आतच पाऊस पडला़ त्यामुळे या भागात टंचाई उग्र रूप धारण करेल, असे सध्याचे चित्र आहे़ तालुक्याच्या अन्य मंडळातही पाणीटंचाईचे चटके बसणार आहेत़
३४ लाख रूपये बाकी
- १९१ गावे, १०५ वाडीतांडे असलेल्या किनवट तालुक्यात गतवर्षी ९५ गावांत १०२ विहिरी अधिग्रहणाचे काम करण्यात आले़ त्यापैकी केवळ सात लक्ष रुपयांची बोळवण करण्यात आली़ अद्यापही ३४ लक्ष रुपये येणे बाकीच आहेत़ त्यामुळे गुरूवारी होणाºया बैठकीकडे लक्ष लागले आहे़
- ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ संभाव्य टंचाईची गावे निश्चित करण्यासाठी आ़ प्रदीप नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पाणीटंचाई आराखडा बैठक १५ रोजी पं़ स़ च्या सभागृहात होणार आहे़ मात्र उदासीन धोरण राबवणा-या शासनाच्या काळात मंजूर आराखड्यातील कामांना पुन्हा वर्षभर निधीची प्रतीक्षा करावी लागेल का ? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे़ बैठकीचे फलित संभाव्य टंचाई निर्माण झालेल्या गावांना कितपत मिळणार याकडे लक्ष लागले आहे़