“स्वारातीम” विद्यापीठ आणि परमाणु खनिज संचालनालय यांच्यात सामंजस्य करार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 08:24 PM2021-02-26T20:24:51+5:302021-02-26T20:25:09+5:30
परमाणु खनिज अन्वेषण तथा अनुसंधान निदेशालय, हैद्राबाद हे भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाचे एक महत्त्वाचे संशोधन केंद्र आहे.
नांदेड- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाच्या परमाणु खनिज अन्वेषण तथा अनुसंधान निदेशालय हैद्राबाद यांच्यात शैक्षणिक बाबी विषयी पाच वर्षासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. हा करार ऑनलाईन पद्धतीने गुरुवारी पार पडल्याचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी सांगितले.
परमाणु खनिज अन्वेषण तथा अनुसंधान निदेशालय, हैद्राबाद हे भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाचे एक महत्त्वाचे संशोधन केंद्र आहे. देशाच्या अणुशक्ती विषयक कार्यक्रमामध्ये या निदेशालयातील भूशास्त्र, भूगोल, अनुभौतिकीशास्त्र, रसायनशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे आणि अभियांत्रिकी शाखांच्या तज्ज्ञ शास्त्रज्ञांचा मोलाचा वाटा असतो. परमाणु खनिज निदेशालय देशातील विविध विद्यापीठे व संशोधन संस्थाशी समन्वयाने भूशास्त्र, विश्लेषणात्मक रसायनशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे या विषयातील संशोधनास चालना देते. विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण, संशोधन प्रकल्पे राबविण्यासाठी सहाय्य करते. या सामंजस्य करारामुळे विद्यापीठातील शिक्षक, संशोधक व विद्यार्थी यांना या सुविधांचा लाभ घेता येणार आहे. या सामंजस्य कराराचे समन्वय विद्यापीठाच्या भूशास्त्र संकुलाद्वारे करण्यात येणार आहे. यामध्ये संशोधन, शिक्षण, शैक्षणिक साहित्य आणि इतर संशोधन साहित्याची दोन्ही संस्थांमध्ये देवाण-घेवाण, एकत्रित संशोधन प्रकल्प राबविणे, प्रशिक्षण व कार्यशाळांचे आयोजन, संशोधनासाठी विद्यार्थी, संशोधक, शिक्षक आदान-प्रदान यांचा अंतर्भाव असणार आहे.
“दोन्ही संस्थाच्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन, प्रयोगशाळा व इतर शैक्षणिक बाबींचा विद्यापीठातील शिक्षक व विद्यार्थ्यांना फायदा होणार असल्याचे कुलगुरू डॉ. भोसले म्हणाले. यावेळी आभासी स्वरूपात परमाणु खनिज अन्वेषण तथा अनुसंधान निदेशालयाचे संचालक डॉ. डी. के. सिन्हा व विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे यांनी करारावर स्वाक्षरी केली. यावेळी कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्यासह प्र-कुलगुरू डॉ. जोगेन्द्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एल.एम. वाघमारे, नवोपक्रम नवसंशोधान व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. राजाराम माने, सहायक कुलसचिव डॉ. सरिता यन्नावार व भूशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. के. विजयकुमार आदींची उपस्थिती होती.