तीन दिवसांत भूसंपादनाचा मावेजा दया; नांदेड जिल्हाधिकार्यांसह तिघांना न्यायालयाचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 07:35 PM2018-01-16T19:35:13+5:302018-01-16T19:38:54+5:30
गुरु -त्ता -गद्दीच्या काळात गुरुद्वारा परिसरात रस्ते रुंदीकरणासाठी भूसंपादन करण्यात आलेल्या जमिनीचा मावेजा देण्याचे आदेश न्यायालयाने देवूनही तो न दिल्याने जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त आणि भूसंपादन अधिकारी या तिघांना दिवाणी न्या़एऩएस़ मोमीन यांनी वॉरंट बजावले असून तीन दिवसांत सदर रक्कम अदा करण्यास सांगितले आहे़ अर्जदाराला तीन दिवसांत रक्कम न दिल्यास वरील तीनही उच्चपदस्थ अधिकार्यांवर कारवाई होवू शकते़
नांदेड : गुरु -त्ता -गद्दीच्या काळात गुरुद्वारा परिसरात रस्ते रुंदीकरणासाठी भूसंपादन करण्यात आलेल्या जमिनीचा मावेजा देण्याचे आदेश न्यायालयाने देवूनही तो न दिल्याने जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त आणि भूसंपादन अधिकारी या तिघांना दिवाणी न्या़एऩएस़ मोमीन यांनी वॉरंट बजावले असून तीन दिवसांत सदर रक्कम अदा करण्यास सांगितले आहे़ अर्जदाराला तीन दिवसांत रक्कम न दिल्यास वरील तीनही उच्चपदस्थ अधिकार्यांवर कारवाई होवू शकते़
२००८ मध्ये गुरु -त्ता -गद्दी त्रिशताब्दी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला़ शहरातील विकासकामांसाठी अनेक ठिकाणी भूसंपादन करण्यात आले़ जमीन गेलेल्यांना चांगला मावेजा मिळेल असे आश्वासनही त्यावेळी देण्यात आले होते़ गुरुद्वारा परिसरात गुरुबचनकौर मदनसिंघ यांची जागा होती़ या जागेचेही संपादन करण्यात आले़ मात्र शासनाने दिलेल्या मावेजावर गुरुबचनकौर समाधानी नसल्याने त्यांनी मावेजा वाढवून मिळावा असा अर्ज न्यायालयात केला़ या प्रकरणात साक्षीपुरावे झाल्यानंतर २०१५ मध्ये न्यायालयाने गुरुबचनकौर यांना संबंधित यंत्रणेने ३ लाख १० हजार रुपये द्यावेत असे आदेश दिले होते़ न्यायालयाच्या निर्णयानंतरही पैसे न दिल्याने शासनाचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त व भूसंपादन अधिकारी यांना प्रतिवादी करण्यात आले होते़
जवळपास तीन वर्षांनंतरही गुरुबचनकौर यांना पैसे देण्यात आले नाहीत़ या प्रकरणात गुरुबचनकौर पुन्हा न्यायालयात गेल्या़ त्यांनी जिल्हाधिकारी, आयुक्त व भूसंपादन अधिकारी यांनी चालढकल केल्यामुळे त्यांना तुरुंगात टाकावे अशी विनंती न्यायालयाकडे केली़ न्यायालयाने उपलब्ध साक्षीपुराव्याच्या आधारे तिघांनाही वॉरंट बजावले आहेत़ एखाद्याला दिवाणी तुरुंगात टाकावयाचे असल्यास त्याचा खर्च अर्जदारास करावा लागतो़ त्यानुसार प्रत्येक व्यक्तीस दररोज ६० रुपये असे न्यायालयात भरावे लागतात़ त्यानंतर दिवाणी तुरुंगात ज्याला टाकावयाचे आहे त्याच्याविरोधात पकड वॉरंट जारी होते़
विशेष म्हणजे, गुरुबचनकौर यांनी तीन दिवसांचे पैसेही भरले आहेत़ हे पैसे भरल्यानंतरच न्या़मोमीन यांनी तिघांना वॉरंट जारी केले आहे़ दिवाणी न्यायालयाच्या निर्णयानुसार गुरुबचनकौर यांचे पैसे आदेशानुसार दिलेल्या वेळेत अदा केल्यास कारवाई टाळता येवू शकते़. सदर प्रकरणात महापालिकेने तक्रारकर्त्यांच्या नावे १ लाख ६६ हजार ९९४ रुपयांचा धनादेश अदा केला आहे. २० नोव्हेंबर २०१७ रोजी तो अदा केल्याची माहिती मनपाचे विधि अधिकारी अजितपालसिंघ संधू यांनी दिली. सदर प्रकरणात हिशेबात गफलत झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत आहे. याबाबत मंगळवारी न्यायालयात पैसे भरल्याबाबतची माहिती सादर केली जाईल, असेही ते म्हणाले.