एमएचटी-सीईटीच्या तांत्रिक चुकीचा विद्यार्थ्यांना फटका, अनेकांचे वर्ष वाया जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2021 01:22 PM2021-09-30T13:22:34+5:302021-09-30T13:24:24+5:30
यंदा या कक्षाने टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेस (टीसीएस) ऐवजी अन्य कंपनीमार्फत ही परीक्षा घेतली जात आहे.
- भारत दाढेल
नांदेड : विद्यार्थ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता पेपर पॅटर्न मध्ये केलेल्या तांत्रिक बदलामुळे एमएचटी सीईटी (MHT-CET ) परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांना फटका बसला असून त्यामुळे महत्त्वाचे वर्ष वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सध्या एमएचटी सीईटी परीक्षा सुरू आहे. यंदा या कक्षाने टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेस (टीसीएस) ऐवजी अन्य कंपनीमार्फत ही परीक्षा घेतली जात आहे. पीसीएमबी आणि पीसीबी या दोन ग्रुपसाठी स्वतंत्र साॅफ्टवेअर विकसित करण्यात आले. एकूण १८० मिनिटांसाठी ही परीक्षा होत आहे. त्यात दोन भाग असून फिजिक्स , केमिस्ट्री व मॅथ किंवा बायोलॉजी असे दोन भाग करण्यात आले आहे. मात्र, हे स्वतंत्र भाग असले तरी तसे सॉफ्टवेअर मात्र मानत नाही. एखाद्या विद्यार्थ्यांचा मॅथ हा विषय स्कोअरिंग असेल व त्याने तसा तो पेपर सोडविला तर ९० मिनिटे संपल्यानंतर दुसरा पेपर फिजिक्स, केमिस्ट्रीचा उघडत नाही. त्या विद्यार्थ्यांला या पेपरपासून वंचित राहावे लागत आहे. वास्तविक परीक्षा यंत्रणेने याबाबत प्रवेश पत्रावर किंवा एमएचटी सीईटीच्या अधिसूचनेत असा कुठेही उल्लेख केलेला नाही. परीक्षा ऑनलाईन असल्यामुळे विद्यार्थ्यांना पेपर सोडविण्यापूर्वी सूचना दिल्या जात आहेत. त्याही स्पष्ट नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडत आहे.
सीईटी सेलला जर, फिजिक्स, केमिस्ट्रीचा पेपर पहिल्यांदा सोडविणे अपेक्षित असेल तर, दुसरा पेपर लॉक असायला हवा असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तसेच याबाबतच्या सर्व सूचना निसंदिग्ध असायला हव्या होत्या. विद्यार्थ्यांना पूर्व कल्पना न देता केलेला हा बदल विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळणारा आहे. अनेक विद्यार्थ्यांची कोंडी झाली आहे. याबाबत सीईटी सेलकडे मेलद्वारे तक्रारी केल्या असता कोणताही प्रतिसाद मिळत नाही. सीईटी सेलच्या भ्रमणध्वनीवर संपर्क केला तरी तेथे कोणीही उपलब्ध नसतात. याबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाने दखल घेऊन ज्या विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना दुबार परीक्षेची संधी द्यावी, अशी मागणी होती.
सीईटी सेलने या संदर्भात कोणतीही पूर्वसूचना न देता केलेला बदल हा अन्यायकारक आहे. त्यामुळे आम्ही चॉईसप्रमाणे पेपर सोडवू शकत नाही. मॅथसाठी कच्चे काम करावे लागते. त्यासाठी अधिक वेळ लागतो. त्यामुळे मंडळाने कोणता पेपर आधी सोडवावा, हा चॉईस विद्यार्थ्यांना दिला पाहिजे.
-निकेतन उदगीरे, विद्यार्थी, नांदेड
अचानकपणे बदल करणे चुकीचे आहे. मंडळाच्या तांत्रिक अडचणीचा विद्यार्थ्यांना फटका बसू नये, मॅथचा पेपर दुसरा असेल व दोन्ही पेपरचे गुण एकत्रित दिले जात असतील तर, पेपरचा क्रम न सांगता अनिवार्य करण्याचे काय प्रयोजन आहे.
- यश लोंढे, विद्यार्थी, नांदेड.