नांदेड शहरातील ७ हजार मतदारांचे स्थलांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 01:00 AM2018-07-11T01:00:08+5:302018-07-11T01:00:44+5:30
बीएलओमार्फत घरोघरी भेटी देवून मतदार यादी अद्ययावत करण्याची मोहीम प्रशासनाने हाती घेतली होती. यामध्ये नांदेड उत्तर मतदारसंघातील ३ हजार ८८० तर नांदेड दक्षिण मतदारसंघातील ३ हजार २६ मतदार स्थलांतरित झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : बीएलओमार्फत घरोघरी भेटी देवून मतदार यादी अद्ययावत करण्याची मोहीम प्रशासनाने हाती घेतली होती. यामध्ये नांदेड उत्तर मतदारसंघातील ३ हजार ८८० तर नांदेड दक्षिण मतदारसंघातील ३ हजार २६ मतदार स्थलांतरित झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. ज्या मतदारांचा या मोहिमेवेळी शोध लागला नाही अशा मतदारांना सामूहिक सूचना देवून त्यानंतरही आक्षेप प्राप्त न झाल्यास त्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येणार आहेत.
निवडणूक विभागाच्या वतीने सध्या मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. शहरातील उत्तर आणि दक्षिण विधानसभा मतदार संघात बीएलओमार्फत यासाठी १५ मे ते २१ जून या कालावधीत मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत घरोघरी भेटी देण्यात आल्या. यादीवर असलेले मतदार पत्यावर आढळून आले नाहीत त्यांची स्वतंत्र नोंद घेण्यात आली. ही यादी संबंधित तलाठ्यामार्फत त्या त्या भागात प्रसिद्ध करण्यात आली असून नांदेड जिल्हा संकेतस्थळावरही ती टाकण्यात आली आहे.
ज्या मतदारानांना बीएलओ या मोहिमेत शोधू शकले नाहीत, अशा मतदारांना सामूहिक जाहीर सूचनेद्वारे अंतिम संधीची नोटीस देवून त्यांचे आक्षेप प्राप्त न झाल्यास त्यांची नावे वगळण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे तहसीलदार किरण अंबेकर यांनी कळविले आहे.
----
जिल्ह्यात २९ हजार १११ मतदारांना रंगीत ओळखपत्र
जिल्ह्यात निवडणूक विभागाचे ओळखपत्र आधुनिक करण्याचे काम निवडणूक विभागाकडून सुरू करण्यात आले आहे. मतदार यादीतील ज्या मतदारांचे १६ अंकी ओळखपत्र आहे व सदर मतदारांचे कृष्णधवल छायाचित्र आहे असे जिल्ह्यात २ लाख ८५ हजार ४९१ मतदार आहेत. या ओळखपत्राचे आधुनिकीकरण करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत निवडणूक विभागाकडे १ लाख १६ हजार ६८३ मतदारांनी आपले रंगीत छायाचित्र दिले आहेत. त्यानुसार डाटा एन्ट्री करण्यात आलेल्या मतदारांची संख्या ७६ हजार ७४५ आहे तर अंतिम अपडेट झालेल्या मतदारांची संख्या ६४ हजार ३२० इतकी आहे. निवडणूक विभागाने आतापर्यंत २९ हजार १११ मतदारांना रंगीत ओळखपत्र दिले आहेत.
---
रंगीत ओळखपत्रासाठी मतदारांनी आपला रंगीत पासपोर्ट बुथलेवल आॅफिसर अर्थात बीएलओकडे द्यावा किंवा नॅशनल वोटर सर्व्हीस पोर्टल या संकेतस्थळावर मतदारालाही आॅनलाईन फोटो अपलोड करता येणार आहे. त्यानंतर नवीन पीव्हीसी इपिक कार्ड मतदारांना मिळणार आहे. या प्रक्रियेत मतदारांच्या नावाची वगळणी होणार नाही, असेही स्पष्ट केले आहे.