पाण्याअभावी होंडाळा ग्रामस्थांचे स्थलांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 12:55 AM2019-05-16T00:55:37+5:302019-05-16T00:56:43+5:30
होंडाळा पाणीपुरवठा करणारे मोठे मुख्य स्त्रोत नसल्यामुळे या गावाला दरवर्षीच तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते़ नागरिकांना पिण्यासाठी ५ रुपयाला एक घागर खाजगी बोरचे विकत घ्यावे लागते
दत्तात्रय कांबळे।
मुखेड: होंडाळा पाणीपुरवठा करणारे मोठे मुख्य स्त्रोत नसल्यामुळे या गावाला दरवर्षीच तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते़ नागरिकांना पिण्यासाठी ५ रुपयाला एक घागर खाजगी बोरचे विकत घ्यावे लागते तर गावाजवळील एका तलावातून अशुद्ध पाणी नळाद्वारे सोडले जाते़ तर २ हजार ५०० नागरिकांची टँकरच्या एकाच फेरीवर तहान भागवली जाते़ यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले असल्याचे विदारक चित्र होंडाळा गावात आहे.
मुखेड तालुक्यातील जांब बु. बाजारपेठेजवळ असलेले होंडाळा हे गाव २ हजार ५०० लोकसंख्या असलेले व ४०० पेक्षा जास्त कुटुंबसंख्या असलेले ९ ग्रामपंचायत सदस्य संख्या असलेले मोठे गाव असून गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी मोठा स्त्रोत नसल्यामुळे दरवर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. ३० ते ३५ वर्षापूर्वी शासकीय योजनेतून सांगवी बेनक शिवारातील तलावाच्या खाली विहीर खोदून पाणी पुरवठा केला जातो़
आजही त्याच ठिकाणाहून ३० ते ३५ वर्षांपासून पाणीपुरवठा गावाला केला जातो़ या सततच्या पाईपलाईन वापरामुळे ही पाईपलाईन कुचकामी झाली असून जागोजागी फुटलेल्या अवस्थेमध्ये दिसून येते़ गावाजवळ कोठेच जलस्त्रोत नाही़ यामुळे एका तलावातून पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीमध्ये टाकून पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा टाकीत घेतले जाते. हेच अशुद्ध पाणी एक दिवस किंवा दोन दिवसाआड सोडले जाते.
अशा दूषित पाण्याच्या वापरामुळे गावांमध्ये आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून पाण्यापासून होणारे रोग कावीळ, कॉलरा अशा वेगवेगळ्या आजारांना नागरिकांना बळी पडावे लागत आहे. ग्रामपंचायतच्या मागणीप्रमाणे दोन पाणी टँकरची मागणी केली आणि दोन टँकरची मंजुरी पण मिळाली; पण आजघडीला गावात एका टँकरने एकच फेरी केली जाते.
गावची शेती सुद्धा कोरडवाहू जमीन, खरीपाची शेती असून गावांमध्ये कोणताही उद्योग व्यवसाय नाही. या परिस्थितीमुळे होंडाळातील जवळपास २० टक्के लोक गाव सोडून विटकाम, ऊस काम, पुणे, मुंबई, हैदराबाद, अशा शहरात कामासाठी स्थलांतरित झालेले आहेत़ त्यामुळे गाव ओसाड झाले आहे़
येथील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील बोरचे पाणी गावांमध्ये पाईपलाईन द्वारे आणले असून त्या नळाचे पाणी ५ रुपयाला १ भांडे पाणी याप्रमाणे विक्री करतो. यांना विचारले असता ते म्हणाले की बोअरचे पाणी गावाला पुरत नाही. म्हणून अधिग्रहण करता येत नाही़ यामुळे मी हा उपक्रम सुरू केला असे म्हणाले.