नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात गूढ आवाजासह जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 06:21 PM2024-10-25T18:21:11+5:302024-10-25T18:26:19+5:30
या भूकंपाचा केंद्रबिंदू मुखेड शहरापासून १२ किमी दूर दक्षिणपूर्व दिशेला आहे.
नांदेड : मुखेड तालुक्यातील अंबुलगा (बु.) व परिसरात आज दुपारी २:२३ वाजता आणि ५:१३ वाजता असे दोन वेळा भुगर्भातून आवाज येऊन सौम्य हादरे जाणवले. यामुळे नागरिक घाबरून घराबाहेर पडले. यात कोणतीही जीवित व वित्त हानी झाली नसल्याची माहिती जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्राने दिली आहे.
नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील काही भागांत मागील अनेक वर्षांपासून भुगर्भातून गूढ आवाज येऊन भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत आहेत. आज दुपारी २:२३ वाजता मुखेड तालुक्यातील अंबुलगा (बु.) व परिसरात भुगर्भातून आवाज येऊन भूकंपाचा सौम्य धक्का जाणवल्याने ग्रामस्थ घराबाहेर पडले. काही वेळाने हादरा कमी झाला. मात्र, ५:१३ वाजता पुन्हा भुगर्भातून मोठा आवाज होत हादरा जाणवला.
या भूकंपाचा केंद्रबिंदू मुखेड शहरापासून १२ किमी दूर दक्षिणपूर्व दिशेला आहे. या धक्क्यामुळे कुठलीही जीवित व वित्त हानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्रास प्राप्त झाली आहे. भूकंपसदृश्य या हादऱ्यांची तीव्रता रिष्टर स्केलवर अनुक्रमे १. ५ आणि ०. ७ अशी नोंदविण्यात आलेली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.