नांदेडला भूकंपाचा सौम्य धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2020 04:06 PM2020-10-01T16:06:39+5:302020-10-01T16:07:08+5:30
शहरातील गणेशनगर भागात बुधवारी सायंकाळी सौम्य स्वरूपात जमीन हादरल्याची घटना घडली. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भूकंप मापन केंद्रात यासंबंधी तपासणी केली असता १.४ मॅग्नेट्युवस्केल इतका भूकंपाचा सौम्य धक्का असल्याचे निदर्शनास आले.
नांदेड : शहरातील गणेशनगर भागात बुधवारी सायंकाळी सौम्य स्वरूपात जमीन हादरल्याची घटना घडली. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भूकंप मापन केंद्रात यासंबंधी तपासणी केली असता १.४ मॅग्नेट्युवस्केल इतका भूकंपाचा सौम्य धक्का असल्याचे निदर्शनास आले असून यासंबंधी विद्यापीठाच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे अहवाल सादर केल्याची माहिती प्रा. विजयकुमार यांनी दिली.
शहरातील गणेशनगर भागात बुधवारी सायंकाळी किंचित जमीन हादरल्याचे आढळून आले होते. सायंकाळी शहरातील काही भागात पाऊस असल्याने अनेकांना हा भूकंप असल्याचे जाणवलेही नाही. मात्र स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ केंद्रातील भूकंपमापक केंद्रावर १.४ मॅग्नेट्युवस्केल कंपनाची नोंद झाल्याने हा भूकंपच असल्याचे आता पुढे आले आहे.
बुधवारी सायंकाळी बसलेला भूकंपाचा धक्का सौम्य असला तरी नांदेड शहर आणि जिल्ह्याला यापूर्वीही भूकंपाचे धक्के बसलेले आहेत. मार्च २००६, मार्च २०११, नोव्हेंबर मध्येही नांदेडकरांनी भुकंपाचे धक्के अनुभवले होते. मध्यंतरीच्या ८ वर्षात मात्र जिल्ह्यात भूकंपाची कसलीही नोंद नव्हती. जून २०१९ मध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भूकंप मापन केंद्रावर ३.६ रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद झाली. त्यानंतर बुधवारी सायंकाळी नांदेडकरांना हा सौम्य धक्का जाणवला.