नांदेड जिल्ह्यात दूध आंदोलन पेटले; अर्धापूरला टेम्पोवर दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 04:55 PM2018-07-16T16:55:51+5:302018-07-16T16:58:19+5:30
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध आंदोलनाची ठिणगी नांदेड जिल्ह्यातदेखील पडली असून आज सकाळी मालेगाव, पार्डी आणि निळा येथे शेतकऱ्यांनी आंदोलन केले.
नांदेड : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध आंदोलनाची ठिणगी नांदेड जिल्ह्यातदेखील पडली असून आज सकाळी मालेगाव, पार्डी आणि निळा येथे शेतकऱ्यांनी आंदोलन केले.
जिल्ह्यातील बहुतांश गावात दूध उत्पादक शेतकऱ्यांनी देवांना दुग्ध अभिषेक करून या सरकारला सदबुद्धी येऊ दे असे साकडे घातले. दाभाड येथील सत्यगणपतीला दुग्ध अभिषेक करण्यात आला. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणीची दूध संकलन केंद्रे बंदच होती हे आंदोलन संपेपर्यंत कुणीही दूध संकलन करू नये, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे .परंतु जबरदस्तीने कुणी दूध संकलन करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे परिणाम त्यांनाच भोगावे लागतील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशअध्यक्ष प्रा. डॉ.प्रकाश पोपळे यांनी दिला.
आंदोलनात जिल्हाध्यक्ष प्रल्हाद इंगोले ,हनुमंत राजेगोरे,किशनराव देळुबकर,बी डी देशमुख, संदीप राऊत, सागर देशमुख, गोविंदराव जोगदंड, केशव जोगदंड, बाळू जोगदंड, काशीनाथ जोगदंड, अंगद इंगोले, स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेचे नरहरी पोपळे, अरुण पोपळे आदींचा सहभाग होता.
- नांदेड तालुक्यातील निळा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलकांनी दूध वाहतूक करणारा ट्रक अडवून त्यातील दूध रस्त्यावर सांडवून देण्यात आले.
- दुसऱ्या एका घटनेत अर्धापुर तालुक्यातील मालेगाव जवळ दूध वाहतूक करणाऱ्या एका ऑटोतील दूध रस्त्यावर सांडवून देऊन आंदोलकांनी शासनाचा निषेध नोंदविला.
- अर्धापुरनजीक असलेल्या पार्डी येथे आंदोलनास हिंसक वळण मिळाले असून संतप्त शेतकऱ्यांनी दूध वाहतूक करणाऱ्या टेम्पोच्या काचा फोडल्या.