विष्णूपुरीत आज येणार दुधनेचे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 12:33 AM2018-05-15T00:33:17+5:302018-05-15T00:33:17+5:30
शहराची तहान भागविण्यासाठी १६० किलोमीटरचे अंतर पार करुन लोअर दुधना प्रकल्पातील पाणी विष्णूपुरीत मंगळवारी दुपारी १२ वाजेपर्यंत पोहोचणार आहे. नांदेडसह परभणी जिल्ह्यासाठी लोअर दुधना प्रकल्पातून ८ मे पासून पाणी सोडण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : शहराची तहान भागविण्यासाठी १६० किलोमीटरचे अंतर पार करुन लोअर दुधना प्रकल्पातील पाणी विष्णूपुरीत मंगळवारी दुपारी १२ वाजेपर्यंत पोहोचणार आहे. नांदेडसह परभणी जिल्ह्यासाठी लोअर दुधना प्रकल्पातून ८ मे पासून पाणी सोडण्यात येत आहे.
विष्णूपुरी प्रकल्पात आजघडीला केवळ २.१८ दलघमी पाणी शिल्लक आहे. ही टक्केवारी केवळ २.७० टक्के इतकी आहे. लोअर दुधना प्रकल्पातून नांदेडसाठी २५ दलघमी पाणी सोडण्यात येत आहे. परभणी शहरासाठी रहाटी बंधाऱ्यातून तर नांदेड शहरासाठी पूर्णा येथील कोल्हापुरी बंधाºयामार्फत पाणी देण्यात आले आहे. हे पाणी विष्णूपुरी प्रकल्पात पोहोचण्यासाठी मनपा अधिकारी पाण्याच्या मार्गावर नियुक्त करण्यात आले आहेत. हा पाणीउपसा होऊ नये यासाठीही खबरदारी घेण्यात येत आहे.
पूर्णा येथून सोडण्यात आलेले पाणी सोमवारी सायंकाळी अंतेश्वर बंधाºयापर्यंत पोहोचले होते.
अंतेश्वरपासून भनगी, मोहनपूर, रहाटी या भागात मागील काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाळू उपसा झाला आहे. परिणामी मोठ-मोठे डोह या भागात तयार झाले आहेत. हे डोह भरण्यासाठी वेळ लागत आहे. त्याचवेळी वाळू वाहतुकीसाठी तयार करण्यात आलेले रॅम्पही गोदावरी नदीत ‘जैसे थे’ असल्यामुळे पाणी येण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत.
हे सर्व अडथळे पार करत मंगळवारी दुपारी १२ पर्यंत विष्णूपुरी प्रकल्पात लोअर दुधनेतून सोडण्यात आलेले पाणी पोहोचेल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांनी दिली. हे पाणी आणण्यासाठी अजय कोहीरकर, कार्यकारी अभियंता एस.के. सब्बीनवार, कार्यकारी अभियंता आर.एन. देशमुख, मनपाचे उपअभियंता नीळकंठ गव्हाणे आदी अधिकारी, कर्मचारी लक्ष ठेवून आहेत.
या पाण्याचे योग्य नियोजन महापालिकेला करावे लागणार आहे. प्रशासनाने यापूर्वी तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र आगामी मुस्लिम बांधवांचा सुरु होणारा पवित्र रमजान महिना पाहता सध्या सुरु आहे त्याप्रमाणेच पाणीपुरवठा ठेवावा, अशी सूचना केली.
दुसरीकडे विष्णूपुरी प्रकल्प क्षेत्रातून पाण्यासाठी पिकांसाठी मोठ्या प्रमाणात चोरी होते. हजारो पंपांच्या माध्यमातून पाणी उपसा केला जातो.
हा उपसा रोखण्याचीही गरज निर्माण झाली आहे. यासाठी महसूलसह पोलीस, मनपा, विद्युत विभाग यांचे संयुक्त पथक स्थापन केल्यास पाणीचोरीस आळा बसू शकेल.
पाण्याच्या श्रेयवादासाठी चढाओढ
विष्णूपुरी प्रकल्पात दाखल होणाºया लोअर दुधना प्रकल्पातील पाण्याचे श्रेय घेण्यासाठी राजकीय पक्षांत चढाओढ सुरू आहे. महापौर शीलाताई भवरे यांनी महापालिकेच्या प्रयत्नाने हे पाणी विष्णूपुरीत येत असल्याचे सांगितले आहे. तर दुसरीकडे नांदेड दक्षिणचे आ. हेमंत पाटील यांनी आपल्या प्रयत्नातून हे पाणी मिळाल्याचे सांगितले आहे. माजी पालकमंत्री अर्जुन खोतकर यांच्या माध्यमातून हे पाणी नांदेडसाठी आणल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.