जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाची प्रतिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:17 AM2021-03-19T04:17:21+5:302021-03-19T04:17:21+5:30
शासनाने कर्जमुक्ती योजना राबवून लाखो शेतकर्यांना लाभ दिला. परंतु, प्रोत्साहनपर अनुदान म्हणून ५० हजार रूपये नियमितपणे कर्जाची परतफेड करणार्या ...
शासनाने कर्जमुक्ती योजना राबवून लाखो शेतकर्यांना लाभ दिला. परंतु, प्रोत्साहनपर अनुदान म्हणून ५० हजार रूपये नियमितपणे कर्जाची परतफेड करणार्या शेतकर्यांना देण्याचे शासनाने जाहीर केले हाेते. परंतु, आजपर्यंत जिल्ह्यातील एकाही शेतकर्यास लाभ मिळालेला नाही. नियमितपणे कर्ज भरूनही प्रोत्साहन मिळत नसल्याने शेतकर्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. त्याचबरोबर या प्रोत्साहन अनुदानासाठी काय काय निकष लावणार हेही जाहीर केलेले नाही. त्यामुळे सदर योजनेचा प्रत्यक्षात किती शेतकर्यांना लाभ मिळेल हे सांगणे कठीण आहे.
नांदेड जिल्ह्यातील १ लाख ८५ हजार ५८३ शेतकर्यांना कर्जमुक्ती मिळाली आहे. त्यांच्या याद्यादेखील वेगवेगळ्या टप्प्यात प्रसिद्ध झाल्या. यातील जवळपास सर्वच शेतकर्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झाली आहे. परंतु, ७ हजार शेतकर्यांचे आधार प्रमाणीकरण शिल्लक असल्याने त्यांना कर्जमुक्तीच्या रक्कमेची प्रतिक्षा आहे. त्याचबरोबर नव्याने १० ते १२ हजार शेतकर्यांची नावे नवीन यादीत येणार असल्याने ती कधी येणार असा प्रश्न कर्जमुक्तीत पात्र ठरलेल्या परंतु आजपर्यंत यादीत नाव न आलेल्या शेतकर्यांना पडला आहे.