गोदामाईच्या कुशीत लाखो माशांनी सोडला जीव; कोण जबाबदार?
By श्रीनिवास भोसले | Published: April 22, 2023 06:59 PM2023-04-22T18:59:17+5:302023-04-22T18:59:34+5:30
नांदेड शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदी पात्राच्या बंदाघाट, गोवर्धन घाट आणि नावघाट परिसरात मासे मृतावस्थेत आढळून आले आहेत; मासेमारीच्या उद्देशाने घातपाताची शक्यता
नांदेड:गोदावरी नदीपात्रात अचानकपणे लाखो मासे मृतावस्थेत आढळून आले आहेत. गोवर्धन घाट परिसरात लाखो माशांचा खच पडला असून नदीपात्रात मृत मासे तरंगत आहेत. परिणामी परिसरात दुर्गंधी पसरली आहे. सदर मासे काढण्यासाठी मनपा यंत्रणा कामाला लागली असून जेसीबीच्या सहाय्याने मासे काढले जात आहेत. परंतु, एवढ्या मोठ्या प्रमाणात मासे मृत होण्याची ही तिसरी वेळ असूनही प्रशासनाला कारण शोधता आलेले नाही. त्यामुळे या निष्पाप माशांचा मृत्यूबद्दल कोणाला जबाबदार पकडणार, असा प्रश्न आहे.
नांदेड शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदी पात्राच्या बंदाघाट, गोवर्धन घाट आणि नावघाट परिसरात मासे मृतावस्थेत आढळून आले आहेत. गतवर्षीदेखील उन्हाळ्यातच अशाचप्रकारे मृत माशांचा खच पडला होता. त्यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळासह मनपानेही पाण्याचे नमुने घेवून तपासणीसाठी पाठवले होते. परंतु, पाण्यात कोणत्याही प्रकारचे केमिकल आढळून आले नाही. त्यामुळे मासे कशामुळे मरण पावले याचे उत्तर अद्यापर्यंत मिळालेले नाही. त्यातच आता शुक्रवारी रात्री माशांचा खच गोदावरी नदीपात्रात मृतावस्थेत आढळून आला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्यात माशांचा मृत्यू झाला, म्हणजे पाणी दुषित असावे अथवा त्यात कोणी तरी मासेमारीच्या उद्देशाने काही तरी केमिकल टाकले असावे, असा अंदाज बांधला जात आहे. मात्र, पाण्याचे नमुने घेवून ते तपासणी केल्याशिवाय सत्यता बाहेर येणार नाही.
मरण पावलेल्या माशांचा गोदावरी काठी ढिग पडला आहे. त्याचबरोबर पाण्यात मरण पावलेले मासे फुगून पाण्याचा प्रवाहाबरोबरच काठेवर येत आहेत. त्यामुळे नदीपात्राच्या कडेला लाखो मासे मृतावस्थेत तरंगत असताना दिसत आहेत. ते मासे काढून टाकण्याचे काम महापालिकेचे कर्मचारी करीत आहेत. मरण पावलेले मासे एवढ्या मोठ्या प्रमाणात आहेत की ते काढण्यासाठी जेसीबीची मदत घ्यावी लागली.
घातपाताची शक्यता
गोदावरी नदी पात्रात अशाप्रकारची घटना घडण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वीदेखील अशाप्रकारे मासे मरण पावले होते. परंतु, त्याचे कारण मिळालेले नाही. पाण्यात कोणतेही केमिकल मिळाले नाही. परंतु, पाण्यात डीओचे प्रमाण कमी होते. मात्र त्यामुळे मासे मरत नाहीत. यंदादेखील तशाचप्रकारे मासे मरण पावले असून पाण्याचे नमुने घेतले आहेत. मृत माशाचे अवशेषही तपासणीसाठी पाठविले जाणार आहेत. त्यामुळे तपासणीनंतरच माशांच्या मृत्यूचे कारण पुढे येईल. पाणी दुर्गंधीयुक्त असते तर आजपर्यंत त्या पाण्यात माशांची वाढ झालीच नसती, असे वाटते. अचानकपणे अशाप्रकारे लाखो मासे मृतावस्थेत आढळणे ही घातपाताची शक्यता वाटते. तरीदेखील आम्ही नमुने घेवून ते तपासणीसाठी पाठविले असून लवकरच माशांच्या मृत्यूचे कारणही पुढे येईल.
- आर. यु. पाटील, उपप्रादेशिक अधिकारी,महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, नांदेड.