मन सुन्न करणारी घटना ! दोन बहिणींमध्ये पेटला वाद, रागात एकीने दुसरीच्या मुलाचा गळा घोटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2021 03:26 PM2021-11-02T15:26:59+5:302021-11-02T15:27:27+5:30
सातत्याने होत असलेल्या वादातून भाच्यालाचा संपवले
लोहा : वाद कोणत्या थराला जाईल, वादातून काय होऊ शकते, याचा विचार कोणीही करू शकत नाही. अशीच काहीशी घटना लोहा तालुक्यातील कामळजवाडी येथे घडली. दोन बहिणींच्या घरगुती वादामध्ये एकीने दुसरीच्या मुलाचा दोरीने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी घडली. सुयोग नागसाखरे (१३) असे मृताचे नाव आहे. तर अरुणा नागसाखरे आरोपीचे नाव आहे.
अरुणा व तिच्या बहिणीमध्ये प्रचंड वाद होते. या वादातून बहीण माहेरी कामळजवाडीला निघून गेली. सोबत तिचा मुलगा सुयोगही होता, तर दुसरीकडे दिपावलीनिमित्त अरुणा ही देखील माहेरी कामळजवाडीला पोहोचली. कामळजवाडीतही दोन्ही बहिणींमध्ये भांडणतंटे सुरू झाले. ३१ ऑक्टोबर रोजीही असाच प्रकार घडला. रागाच्या भरात अरुणाने तिच्या बहिणीचा मुलगा सुयोग याचा दोरीने गळा आवळून खून केला.
घटनेनंतर ती स्वतः माळाकोळी पोलीस ठाण्यात पोहोचली आणि तिने घडलेली घटना पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तिला ताब्यात घेतले व घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. माळाकोळी पोलिसांनी या प्रकरणी रामचंद्र नाथसाखरे यांनी दिलेल्या फिर्याद दिली. तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक माणिकराव डोके करीत आहेत.