मंत्री साहेब, कुठंय औषधी? खोट्या दाव्याने रूग्णांचे नातेवाईक अन् डॉक्टरांमध्ये होतोय वाद...
By श्रीनिवास भोसले | Published: October 5, 2023 03:20 PM2023-10-05T15:20:19+5:302023-10-05T15:22:03+5:30
आम्ही टिव्हीत पाहिलं, औषधी आहे, तुम्ही का देत नाही, म्हणत रूग्णांच्या नातेवाईकांचा डॉक्टर, नर्ससोबत वाद
नांदेड: वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुबलक औषधी असल्याचा दावा केला आहे. परंतु, आजही चिठ्ठी देवून खासगीतून गोळ्या-औषधी आणायला लावली जात आहेत. प्रशासन आणि शासनाच्या खोट्या आश्वासनांमध्ये रूग्ण आणि डॉक्टरांमध्येच वैर निर्माण होत आहे.
एकीकडे प्रशासन आणि शासन औषधी असल्याचा दावा करत आहे, तर दुसरीकडे रूग्णालयात औषधी नसल्याने डॉक्टर, नर्स ती चिठ्ठीवर लिहून देत आहेत. त्यामुळे संभ्रम निर्माण होवून नातेवाईक डॉक्टर, नर्सच्या अंगावर धाऊन येत आहेत. आम्ही टिव्हीत पाहिलं... औषधी आहे.. तुम्ही का देत नाही... त्यातून डॉक्टर, नर्स आणि रूग्णांच्या नातेवाईकात वाद निर्माण होत आहेत. मात्र, या अनास्थेला जबाबदार असणारी रूग्णालयातील अधिकारी मंडळी आणि दावा करणारे शासनकर्ते नामानिराळे आहेत.
सुप्रिया सुळेंसमोर मातेला अश्रू अनावर
हातपाय वाकडे झाले...बाळाला झटके येत होते. बघा बघा म्हणून विनवण्या केल्या... तरी बघत नव्हते... या डॉक्टरांनी माझ्या बाळाचा जीव घेतला म्हणत पैठणच्या एका मातेने हंबरडा फोडला. आक्रोश करणाऱ्या मातेला शांत व्हा, म्हणून धीर देणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे यांना मी कसं शांत राहू... मला १२ वर्षानंतर बाळ झालं हाेतं. त्याचाही जीव घेतला हो...या महिलेच्या आक्रोशाने उपस्थितांचे मन हेलावून टाकले.
चार दिवसात मृत्यूचे अर्धशतक
विष्णुपुरी येथील डॉ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील मृत्यूचे सत्र थांबता थांबेना झाले आहे. मागील 24 तासात आणखी 14 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे चार दिवसात मृत्यूचे अर्धशतक झाले आहे.