मुबलक औषधांचा मंत्र्यांचा दावा, प्रत्यक्षात खडखडाट; वैद्यकीय शिक्षणमंत्री, हा घ्या पुरावा

By श्रीनिवास भोसले | Published: October 4, 2023 06:03 AM2023-10-04T06:03:00+5:302023-10-04T06:04:35+5:30

नसलेल्या औषधांची चिठ्ठी हाती देऊन कर्मचारी सांगतात ‘ हे बाहेरून घेऊन या’

Minister's claim of abundant medicines, in reality rattles | मुबलक औषधांचा मंत्र्यांचा दावा, प्रत्यक्षात खडखडाट; वैद्यकीय शिक्षणमंत्री, हा घ्या पुरावा

मुबलक औषधांचा मंत्र्यांचा दावा, प्रत्यक्षात खडखडाट; वैद्यकीय शिक्षणमंत्री, हा घ्या पुरावा

googlenewsNext

श्रीनिवास भोसले

नांदेड : विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील मृत्यू ही घटना गंभीर आहे. प्रत्येक मृत्यूची चौकशी केली जाईल. परंतु, हे मृत्यू औषधी न मिळाल्याने झाले नसल्याचे सांगत मुबलक प्रमाणात औषधीसाठा असल्याचा दावा वैद्यकीय शिक्षण तथा विशेष साहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत केला. परंतु, त्यांचा दावा खोटा असल्याचे पुरावेच ‘लोकमत’कडे असून मंगळवारी दिवसभरात साडेतीनशेहून अधिक रुग्णांना खासगी मेडिकलवरील औषधींचा डोस घ्यावा लागला आहे.

नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात मागील ४८ तासांत तब्बल ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात १६ नवजात बालकांचा समावेश आहे. या घटनेनंतर वैद्यकीय शिक्षण तथा विशेष साहाय्य मंत्री मुश्रीफ आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, रुग्णालय व परिसरातील अस्वच्छता ही शरमेची बाब आहे. परंतु, झालेल्या प्रकारामुळे येथील समस्यांना वाचा फुटली असून पुढील १५ दिवसांत सर्व त्रुटी दूर केल्या जातील.

यावेळी खासदार प्रतापराव चिखलीकर, आमदार राजेश पवार, आमदार राम पाटील, आयुक्त दिवनकर, संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, अधिष्ठाता एस. आर. वाकोडे आदींची उपस्थिती होती.

समितीमार्फतही चौकशी

विष्णुपुरी येथील रुग्णालयात घडलेल्या प्रकाराची छत्रपती संभाजीनगर येथील त्रिस्तरीय समिती चौकशी करत आहे. त्यांचा अहवाल लवकरच प्राप्त होईल. त्यानंतरही उच्चस्तरीय समिती नेमून सखोल चौकशी करण्याचे आदेश दिल्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

मृत्यूच्या तांडवातही रुग्णांची हेळसांड 

रुग्णालयात झालेल्या ३१ मृत्यूने जिल्हा हादरला आहे. परंतु, प्रशासन शासन याबाबत गंभीर नसल्याचे दिसून आले. मंगळवारी रुग्णालयात रुग्णांची रीघ असूनही त्यांना कोणत्याच प्रकारच्या सुविधा देण्यासाठी यंत्रणा सरसावलेली नव्हती. औषधांसाठी बाहेरच्या मेडिकलचीच वाट धरावी लागली तर नवजात बालक अतिदक्षता विभागातील एसी अन् पंखेही बंदच होते.

रिक्त पदे भरणार

येथील रिक्त पदे भरण्यासाठीही आदेश दिले असून वर्ग १ आणि २ च्या प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर व इतर पदे भरण्याची प्रक्रिया एमपीएससीमार्फत केली जाते. तोपर्यंत येथे कंत्राटी तत्त्वावर जागा भरण्याचे अधिकार अधिष्ठातांना दिले आहेत. इतर नर्स, वार्ड बॉय, स्वच्छता कर्मचारी आदी रिक्त पदे ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत भरू.

- हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षण तथा विशेष साहाय्य मंत्री

या तर सरकारी हत्या

ठाण्यातील सरकारी रुग्णालयात झालेल्या मृत्यू प्रकरणातून राज्य सरकारने काहीही बोध घेतलेला दिसत नाही. औषधे नसल्याने हे मृत्यू झाल्याचे समोर येत आहे हे अत्यंत चीड आणणारे आहे. सरकारकडे जाहिरातबाजी करण्यासाठी, आमदार खरेदीसाठी पैसे आहेत आणि सर्वसामान्य जनतेच्या औषधे खरेदीसाठी पैसे नाहीत का?  हे सरकारी अनास्थेचे बळी असून ३०२ चे गुन्हे दाखल करा.

- नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

खरेदी स्थानिक पातळीवर

शासकीय रुग्णालयासाठी लागणारी ४० टक्के औषधी आणि यंत्रसामग्री खरेदी करण्याचे अधिकार अधिष्ठातांना असून त्यांना त्यासाठी मुंबईला येण्याची गरज नाही. त्यामुळे तुटवडा निर्माण होण्याचा प्रश्नच येत नसल्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. तसेच जिल्हा नियोजन समितीमधून कोट्यवधी रुपयांची तरतूद असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु, प्रत्यक्षात मात्र औषधी साठ्याबाबत विदारक चित्र आहे. याचा फटका सर्वसामान्य रुग्णांना दररोज सहन करावा लागत आहे. 

Web Title: Minister's claim of abundant medicines, in reality rattles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.