कंधार येथील पोलीस निवासस्थानांची दयनीय अवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 12:38 AM2018-05-17T00:38:28+5:302018-05-17T00:38:28+5:30
गंगाधर तोगरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
कंधार : शहरासह सुमारे ११८ गावांच्या कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असणाऱ्या पोलीस कर्मचारी निवासस्थानाची पुरती वाताहत झाली. नवीन घर बांधकामाला कधी मुहूर्त लागणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे़
सुमारे साडेचार दशकांपूर्वी बांधलेल्या या घराची वेळेत देखभाल, दुरुस्ती न झाल्याने पोलिसांना भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली. गत काही वर्षांपासून ४० घरे निकामी झाल्याने अस्वच्छता, मातीचे ढिगारे, झाडे झुडुपे, मोकाट जनावरांचा मुक्तपणे वावर दिसतो़ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी साडेचार दशकांपूर्वी पोलीस कर्मचा-यांसाठी अतिशय देखण्या निवासस्थानाची सोय करण्यात आली़ सुमारे ५० कर्मचा-यांना प्रत्येकी तीन खोल्या व अंगण आदी सुविधा असलेले घर देण्यात येत असे़ दोन हजार चाळीस चौरस मीटरवरील या घराने कर्मचा-यांना मोठा दिलासा मिळाला़ परंतु, कालांतराने या वसाहतीची मोठी पडझड सुरू झाली़ दारे-खिडक्या मोडकळीस आल्या़ भिंतीला तडे गेले़ सिमेंटच्या पत्रांना छिद्रे पडली, संरक्षक भिंतीअभावी वसाहतीत मोकाट जनावरांचा मुक्त संचार झाला़ कसेतरी जीव मुठीत धरून राहत असलेली ४० घरे आता भुईसपाट झाली आहेत़ १० घरांत मोजके कर्मचारी राहतात़ परंतु, या घराची अवस्था दयनीय झाली आहे़
कंधार पोलीस ठाण्यात सुमारे ६५ पोलीस कर्मचारी, एपीआय १ व पीएसआय ३ अशी संख्या आहे़ पोलीस निरीक्षक प्रभारी आहेत़ पोलीस ठाण्यातील अपवाद वगळता सर्व पोलीस व अधिकारी भाड्याच्या रुममध्ये वास्तव्य करतात़ पोलीस निरीक्षकाचे निवासस्थानही सोयीसुविधेच्या गर्तेत आहे़ त्यामुळे त्यांनाही भाड्याने रहावे लागत आहे़ सण-उत्सव, जयंती आदींसह सतत शांतता सलोखा कायम राखण्यासाठी पोलीस कर्मचारी अपार परिश्रम घेतात़ परंतु, आपल्याच विभागात घर नसल्याची खंत व्यक्त करतात़ एका वसाहतीत असण्याऐवजी विखुरलेल्या अवस्थेत वास्तव्याला शहरात आहेत़ गत काही वर्षांपासून ४० घरे निकामी झाल्याने अस्वच्छता, मातीचे ढिगारे, झाडे झुडुपे, मोकाट जनावरांचा मुक्तपणे वावर दिसतो़ जुन्या बांधकामाशिवाय नवीन बांधकामात काही कर्मचारी वास्तव्याला आहेत़
मागील वर्षी सार्वजनिक बांधकाम विभागाने ४ हजार ६२४ चौरस मीटरवर १ कोटी ८५ लाख १३ हजारांचे बांधकाम करण्यासाठीचा प्रस्ताव मंत्रालयात पाठविला होता असे सांगण्यात आले़ जमीनस्तरावर १५७० चौ़मी़, पहिला मजला १३२६ चौ़मी़ व दुसरा मजला १३२६ चौ़मी़ बांधकामातून ७० घरे प्रस्तावित होती़ पोलिसांच्या या घराशिवाय ४०२ चौ़मी़ वर ३ पीएसआयसाठी निवास व्यवस्था आदी त्यात होते़ परंतु प्रस्ताव परत आला़ आणि कर्मचाºयांना घराचे स्वप्न लांबणीवर टाकावे लागले़ आता नवीन प्रस्ताव, मंजुरी, प्रत्यक्ष बांधकाम प्रारंभ व वास्तव्य असा प्रवास कधी होणार? हा प्रश्न आहे़
पोलीस कर्मचा-यांसाठी ७० घरे व पीएसआयसाठी तीन अशी १ कोटी ८५ लाख १३ हजार खर्चाची निवासस्थाने बांधण्याचा प्रस्ताव शासनाकडे (नियोजन विभाग) पाठविण्यात आला होता़ तो परत आला आहे़ पुन्हा नव्याने योग्य पद्धतीत प्रस्ताव दोन आठवड्यांत पाठविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत़ नवीन दराप्रमाणे हा प्रस्ताव राहील -ए़एस़ बाळे, उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग, कंधाऱ