मराठवाड्याचे दुर्दैव ! धरणे भरूनही पूर्ण क्षमतेने पाणी मिळण्याची शाश्वती नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 07:05 PM2020-08-28T19:05:24+5:302020-08-28T19:16:06+5:30
यंदा मराठवाड्यातील धरणे तुडूंब आहेत़ सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पात ८४़१७ टक्के पाणीसाठा आहे.
- विशाल सोनटक्के
नांदेड : मराठवाड्यातील प्रमुख धरणांत यंदा समाधानकारक पाणीसाठा आहे़ मागील वर्षीही परतीच्या पावसामुळे मराठवाड्यातील धरणे तुडुंब झाली होती़ मात्र, बिगर सिंचनासाठी झालेला पाण्याचा वापर, बाष्पीभवन आणि वहन व्यवस्थेत वाया गेलेले पाणी यामुळे मराठवाड्यात निर्मित सिंचन क्षमतेच्या २३़८७ टक्के क्षेत्रालाच पाणी मिळाले आहे़.
यंदा मराठवाड्यातील धरणे तुडूंब आहेत़ सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पात ८४़१७ टक्के तर माजलगाव प्रकल्पात ७३़२७ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला असून उर्ध्व पैनगंगा ९०़३९ टक्के भरले असून पूर्णा येलदरी प्रकल्प गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत १०० टक्के भरलेला आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत़ मात्र मागील वर्षीच्या मराठवाड्यातील सिंचनाचा मागोवा घेतला असता निर्मित सिंचन क्षमतेपेक्षा २३़८७ टक्के क्षेत्रालाच शेतीसाठी पाणी मिळाल्याचे दिसून येते़.
- मागील वर्षीपर्यंतची औरंगाबादची निर्मित सिंचन क्षमता १३५़७४२ हजार हेक्टर एवढी होती़ मात्र ५६़३३१ हजार हेक्टर क्षेत्रालाच म्हणजे निर्मित सिंचन क्षमतेच्या १६़८२ टक्के क्षेत्राला पाणी मिळाले़
- जालना जिल्ह्याची निर्मित सिंचन क्षमता ९७़७७४ हजार हेक्टर होती़ त्यातपैकी ३७़०१० हजार हेक्टर सिंचित क्षेत्र झाले़ म्हणजेच निर्मित सिंचन क्षमतेच्या १३़६७ टक्के क्षेत्रालाच पाणी मिळाले़
- बीड जिल्ह्याची निर्मित सिंचन क्षमता १८४़३९६ हजार हेक्टर असताना २३़६६९ हजार हेक्टर (१९़३१ टक्के) क्षेत्र सिंचित झाले़
- लातूर जिल्ह्याची निर्मित सिंचन क्षमता ११३़५३१ हजार हेक्टर असताना ९़९७१ हजार हेक्टर (१७़४७ टक्के) क्षेत्राला पाणी मिळाले़
- उस्मानाबाद जिल्ह्याची निर्मित सिंचन क्षमता १४०़६८७ हजार हेक्टर असताना १०़४०९ हजार हेक्टर (२०़१६ टक्के) क्षेत्रासाठीच पाणी उपलब्ध झाले़
- नांदेड जिल्ह्याची निर्मित सिंचन क्षमता २१०़४४४ हजार हेक्टर असताना १०६़०९६ म्हणजेच निर्मित सिंचन क्षमतेच्या २५़३५ टक्के क्षेत्राला पाणी मिळाले़
- परभणी जिल्ह्याची निर्मित सिंचन क्षमता २१२़४४७ हजार हेक्टर असताना ६२़४१८ हेक्टर म्हणजेच निर्मित सिंचन क्षमतेच्या ३७ टक्के क्षेत्रासाठी पाणी उपलब्ध झाले़
- अशीच परिस्थिती हिंगोली जिल्ह्याचीही आहे़ जून २०१८ अखेर जिल्ह्याची एकूण निर्मित सिंचन क्षमता ५६़०१८ हजार हेक्टर एवढी असताना २०१८-१९ या वर्षात २९़२५० हेक्टर क्षेत्र सिंचित झाले़ म्हणजेच निर्मित सिंंचन क्षमतेच्या तुलनेत १४़०७ टक्के क्षेत्रालाच पाणी मिळाले़
बाष्पीभवन, वहन व्ययाचा सिंचनावर परिणाम
प्रकल्पीय उपयुक्त पाणीसाठा मोठा असला तरीही शेतीला त्या तुलनेत पाणी मिळत नाही. राज्याचा विचार करता सन १८-१९ या वर्षात उपलब्ध पाण्याच्या ९़७८ टक्के पाणी बाष्पीभवनामध्ये गेले. नदीतील वहन व्ययामुळे ४़७६ टक्के पाण्याचा अपव्यय झाला़ त्यातच १७़३६ टक्के पाणी बिगर सिंचनासाठी वापरल्याने ३७़०९ टक्के पाणी शेतीसाठी उपलब्ध झाले़ मराठवाड्यातील मोठा भाग गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत येतो़ या भागात एकूण पाण्याच्या तुलनेत ९़०३ टक्के पाण्याचे बाष्पीभवन झाले़ ४़३१ टक्के पाणी नदीतील वहन व्ययामध्ये गेले़ १४़६२ टक्के पाणी बिगर सिंचनाकरिता गेल्याने सिंचनासाठी केवळ २७़७९ टक्के पाण्याचा वापर झाला़
मराठवाड्यात वाढली सिंचन क्षमता
जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार ३० जून २०१७ च्या तुलनेत ३० जून २०१८ या कालावधीत मराठवाड्यात अवघी ०़०६ लाख हेक्टर सिंचन क्षमता वाढली. महाराष्ट्राचा विचार करता याच कालावधीत महाराष्ट्रात ०़८६ लाख हेक्टर क्षमता वाढलेली आहे़
लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद आणि बिल थकले असे दुहेरी संकट मेसचालकावर आले आहेhttps://t.co/QgWnmiroBy
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) August 28, 2020