'मिसिंग लिंक' जुळली; एकाच कुटुंबातील तिघांच्या हत्याकांडानंतर गायब गतीमंद मुलाचाही मृतदेह आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2021 02:35 PM2021-12-13T14:35:34+5:302021-12-13T14:36:02+5:30
यापूर्वी मातापित्यासह मुलाचा मृतदेह जंगलात आढळला होता
हदगाव ( नांदेड ) : एकाच कुटुंबातील तिहेरी हत्याकांड झालेल्या कुटुंबातील गतीमंद मुलगा अद्यापही बेपत्ताच होता; परंतु रविवारी सकाळी टेंभी येथील स्वतःच्या विहिरीत त्याचा मृतदेह आढळला आहे. ६ डिसेंबर रोजी टाकराळा शिवारात एकाच कुटुंबातील तीन व्यक्तीचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळले होते. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. मायलेकराचा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. तर कुटुंबप्रमुख शांतावन कावळे यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला होता.
हे कुटुंब हिमायतनगर तालुक्यातील टेंभी या गावातील मूळ रहिवासी असून ते मुंबईलाच कामानिमित्त राहत होते. त्यामुळे गावात त्यांची फारसी ओळखही नव्हती. कोरोना महामारीमुळे या कुटुंबावर बेकारीची वेळ आल्यामुळे ते गावाकडे आले. उमरखेड येथे मिळेल ते काम केले. २४ नोव्हेंबर रोजी हिमायतनगर येथे किरायाच्या खोलीत ते राहण्यासाठी आले होते. खोलीत पसारा आणून टाकला व २८ नोव्हेंबरला ते बाहेर पडले परत आलेच नाही. ६ डिसेंबर रोजी हदगाव तालुक्यातील टाकराळा शिवारातील जंगलात एका लाकूडतोड्या व्यक्तीला शांतावनचा मृतदेह झाडाला लटकलेला दिसला. तो घाबरुन गावात पळत आला व पुढाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर वनविभाग तामसा पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांना आणखी काही अंतरावर कुजलेल्या अवस्थेत दोन मृतदेह आढळले. घटनास्थळी एक मोबाईल आढळला होता. मृतदेह छिन्नविछिन्न झाल्यामुळे नातेवाईकांना बोलावून जंगलातच अंत्यविधी करण्यात आला.
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार त्या दोघांत नेहमीच वाद होत असत. शांतावन पत्नी सीमावर संशय घेत असे. त्यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. पण या कुटुंबाला अभिजित (वय २२) हा गतिमंद मुलगा असल्याची माहिती पुढे आली. पण त्याचा मोबाईल बंद होता व सापडत नव्हता. त्यामुळे पोलीस चक्रावून गेले होते. त्याचाही घातपात होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली होती. मयत शांतावन यांचा भाऊ निळकंठ कावळे यांच्या तक्रारीवरून तामसा ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला व हिमायतनगर पोलीस ठाण्यात अभिजितची मिसिंग दाखल केली होती. तामसा हिमायतनगर पोलीस वरिष्ठ अधिकारी या हत्याकांडाचा शोध घेत होते. रविवारी सकाळी टेंभी गावातील त्यांच्या शेतातील विहिरीत अभिजितचा मृतदेह आढळला आहे. आता हा खून बापानेच केला की या चारही खुनामागे इतर कोणाचा हात आहे, हे तपासणे पोलिसांना कठीण झाले आहे.