किनवट तालुक्यात रेशीम शेती वाढविण्यासाठी मिशन २००० हेक्टर राबविणार - जिल्हाधिकारी डॉ इटनकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:15 AM2021-01-02T04:15:21+5:302021-01-02T04:15:21+5:30
नानाजीराव देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत प्रधानसांगवी येथे १२ शेतकरी असून तीन रेशीम शेती मंजूर आहे. नऊ प्रस्तावित आहे. आत्मा ...
नानाजीराव देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत प्रधानसांगवी येथे १२ शेतकरी असून तीन रेशीम शेती मंजूर आहे. नऊ प्रस्तावित आहे. आत्मा अंतर्गत ११ गट स्थापन आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन प्रशासन आपल्या गावी हा उपक्रम राबविला. यावेळी नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, नांदेडचे उपवनसंरक्षक आर.ए. सातेलीकर, जिल्हा कृषी अधीक्षक चलवडे, उपविभागीय कृषी अधिकारी डी.एम. तपासकर, तहसीलदार उत्तम कागणे, बीडीओ सुभाष धनवे, गटशिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने, तालुका कृषी अधिकारी बी.बी. मुंडे आदींची उपस्थिती होती.
भारतातील आणि चीनमधील रेशीम उद्योग चांगला आहे. रेशीमला मार्केट जास्त व पैसा जास्त आहे. सध्या चारशे हेक्टर क्षेत्र असून, ते पाचपट झाले पाहिजे, यासाठी मिशन २००० हेक्टर उपक्रम राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिल्या आहेत. नगदी पैसा मिळत असल्याने कोरडवाहू शेतकऱ्यांनी ठिबक करून रेशीम शेती करावी, असे जिल्हाधिकारी इटनकर म्हणाले. भांडणतंटे सोडून चांगले कामे करा. अंडीपुंजीसाठी चॉकी सेंटर तयार करा. प्रशिक्षणासाठी शेतकऱ्यांना बेंगळुरूला पाठवा, असेही जिल्हाधिकारी म्हणाले. रेशीम शेतीसाठी किनवटला सेंटर निर्माण करा, रोजगार मिळेल, असे आवाहन केले.
गावचे सरपंच तथा शेतकरी विठ्ठल किरवले यांनी पारंपरिक शेती सोडून आधुनिक पद्धतीने शेती केली आहे. रेशीम शेडसाठी मस्टरऐवजी अग्रीम द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. पद्माकर आरसोड या शेतकऱ्यानेही आपले मत मांडले. मोहपूरचे शेतकरी विश्वनाथ खुडे यांनी तीन वर्षांच्या रेशीम शेतीचा अनुभव कथन केला. मेहनत कमी उत्पादन जास्त रेशीम शेती ही शेतकऱ्यांना परवडणारी असल्याचे खुडे यांनी सांगितले.
यावेळी शेतकऱ्यांसह बालविकास प्रकल्प अधिकारी प्रफुल्ल बागल, वनक्षेत्रपाल के.एन. खंदारे यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन आत्माचे शिवप्रसाद पटवे यांनी केले.
जिल्हाधिकाऱ्यांनी गोकुंदा येथील गोणारकर यांच्या गांडूळ खत प्रकल्पाला भेट दिली. त्यानंतर अंबाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या शिवरामखेडा येथील मधसंकलन केंद्राला भेट दिली. तर अंबाडी येथील अभि. प्रशांत ठमके यांच्या शेतातील सामूहिक शेततळेमधील मत्स्यव्यवसायाला भेट दिली.