आमदार साहेब तुमचा पक्ष कोणता?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:22 AM2021-09-15T04:22:59+5:302021-09-15T04:22:59+5:30
लोहा : विधानसभा निवडणुकीत कंधार-लोहा मतदारसंघातून श्यामसुंदर शिंदे निवडून आले. आमदार म्हणून विधानसभेत गेले. निवडून येऊन जवळपास दीड ते ...
लोहा : विधानसभा निवडणुकीत कंधार-लोहा मतदारसंघातून श्यामसुंदर शिंदे निवडून आले. आमदार म्हणून विधानसभेत गेले. निवडून येऊन जवळपास दीड ते पावणेदोन वर्षांचा कालावधी झाला. यादरम्यान शिंदे यांनी कधी राष्ट्रवादीला पाठिंबा दिला तर कधी पालकमंत्र्यांसोबत जाहिराती छापतात. अलीकडेच त्यांनी शिवसेनेचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतल्याने दोन्ही तालुक्यांतील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम पसरला. आमदार साहेब, आपला पक्ष नेमका कोणता अशी विचारणा त्यांना त्यांच्याच कार्यकर्त्यांकडून होत आहे.
कंधार शहरातील उपविभागीय कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी जाब विचारण्यासाठी गेलेल्या भाजप कार्यकर्त्यांवर त्यांनी गुन्हे नोंदविले. लोहा तालुक्यातील भाजपचेच एक जिल्हा परिषद सदस्य हे तालुक्याचा कारभार सांभाळत असल्याची चर्चा आमदार शिंदे यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. लवकरच नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होणार असून शिंदे हे आपल्या कार्यकर्त्यांना कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढविण्यास सांगतात याकडे मतदारांचे लक्ष वेधले आहे.
कोट.......
विधानसभेच्या निवडणुकीत खासदार प्रतापराव चिखलीकर यांच्या कुटुंबातील उमेदवार नाही म्हणून मी उमेदवारी दाखल केली, साईमंदिर येथे झालेल्या बैठकीत चिखलीकर जे सांगतील त्याप्रमाणे मी काम करेन, असे श्यामसुंदर शिंदे यांनी सांगितले होते. या अटीवर मी माझी उमेदवारी मागे घेतली. मात्र शिंदे यांनी दिलेला शब्द पाळला नाही. - शरद पवार, भाजप तालुकाध्यक्ष, लोहा
आमदार श्यामसुंदर शिंदे एकला चलो रेच्या भूमिकेत असून लोहा-कंधार मतदारसंघात काँग्रेसला सोबत घेऊन चालत नाहीत. आम्ही वेळोवेळी याबाबत वरिष्ठांना कळविले आहे. लवकरच आम्ही पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांची भेट घेणार आहोत. - उत्तम महाबळे, काँग्रेस तालुका उपाध्यक्ष, लोहा
विधानसभा निवडणूक होऊन जवळपास दोन वर्षे झाली. प्रशासनाच्या कामाचा दांडगा अनुभव असणारे आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्याकडून या काळात तालुक्यासाठी एकही मोठा प्रकल्प आला नाही किंवा ते आणू शकले नाहीत. त्यामुळे बेरोजगारांची संख्या वाढली. येणाऱ्या काळात ते काय करणार याकडे मतदारसंघाचे लक्ष आहे. - बालाजी पाटील, मतदार लोहा