वाढीव वीज बिलाच्या विरोधात मनसेचे खळखटयाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 01:07 PM2020-09-07T13:07:15+5:302020-09-07T19:56:34+5:30
राज ठाकरे यांच्या नावाने घोषणा देत त्यांनी कार्यालयातील साहित्याची तोडफोड केली.
मुदखेड (जि़नांदेड) : शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचे लॉकडाऊन काळातील वीजबिल माफ करावे या मागणीसाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी मुदखेड महावितरण कार्यालयाची तोडफोड केली़ यात कार्यालयाचे सुमारे पावणेदोन लाखांचे नुकसान झाले असून कनिष्ठ अभियंता विकास खोब्रागडे यांच्या फिर्यादीनंतर मुदखेड पोलीस ठाण्यात आठ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
मनसेच्या स्थानिक शाखेने सोमवारी सकाळी मुदखेड येथील महावितरणच्या कार्यालयात आंदोलन केले़ कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एप्रिल ते जुलै या चार महिन्यात कडक लॉकडाऊन करण्यात आले होते़ या कालावधीत बहुतांश आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे़ त्यातच महावितरणने हजारो रुपयांची वीज बिले दिले आहेत़ ही वीज बिले भरायची कशाने असा सवाल करीत वीज बिल माफ करावे असे निवेदन पदाधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आले होते़ मात्र या निवेदनाची दखल न घेतल्याने मनसेने हे आक्रमक आंदोलन केले़
सकाळी ११ वाजेच्या सुमारास पदाधिकाऱ्यांनी कंपनी कार्यालयात संगणकासह खुर्च्या तसेच टेबलाची तोडफोड केली़ यावेळी महावितरण विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली़ या आंदोलनामुळे मुदखेडमध्ये एकच खळबळ उडाली़ या तोडफोडीत वीज वितरण कार्यालयाचे १ लाख ९१ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगत कनिष्ठ अभियंता विकास खोब्रागडे यांनी मुदखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर मनसे तालुकाध्यक्ष माधव पावडे यांच्यासह मयूर पाटील गाढे, अभिजित नातेवार आदी आठ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़