शेतकऱ्याच्या असहायतेची खिल्ली; बँक व्यवस्थापकाने पीक कर्ज तर दिलेच नाही वरून म्हणतो आत्महत्या कर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 01:41 PM2020-12-22T13:41:56+5:302020-12-22T13:49:41+5:30
बँकेकडून नवीन पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे.
नांदेड- लोहा तालुक्यातील जामगा-शिवणी येथील शेतकऱ्याने नवीन पीक कर्ज मिळावे यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या लोहा शाखेत अनेक दिवस खेटे मारले. परंतु बँकेने त्यांना दाद दिली नाही. उलट त्या शेतकऱ्यास बँक व्यवस्थापकाने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा अजब सल्ला दिला. या प्रकाराचा शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला होता. त्यानंतर या प्रकरणात लोहा पोलीस ठाण्यात बँक व्यवस्थापकाच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दुष्काळाच्या गर्तेत अडकलेल्या शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून वेगवेगळे पॅकेज घोषित होत आहेत. मात्र बँकांकडून प्रत्येक योजनांमध्ये आडकाठी आणली जाते. जामगा-शिवणी भागातील शेतकरी बळीराम शेषराव बोमनाळे यांनी दोन वर्षापूर्वी महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून पीक कर्ज घेतले हाेते. घेतलेल्या कर्जाची त्यांनी २८ जून २०२० रोजी परतफेडही केली. आता पुन्हा नवीन कर्ज घेऊन शेती करावी म्हणून जुलै महिन्यांपासून ते बँकेकडे पीक कर्जाची मागणी करीत होते. परंतु बँकेकडून नवीन कर्ज देण्यास टाळाटाळ करण्यात आली.
१८ डिसेंबर रोजी बोमनाळे हे पुन्हा बँकेत गेले. यावेळी त्यांनी बँक व्यवस्थापकाला पीक कर्ज देण्याची विनंती केली. तसेच पीक कर्ज न मिळाल्यास उपोषण करण्याचा इशारा दिला. परंतु व्यवस्थापकाने शिवीगाळ करीत त्यांना बाहेर काढले. तसेच अंगावर रॉकेल ओतून पेटून घेण्याचा सल्ला दिला होता. या प्रकरणात बोमनाळे यांच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंदविण्यात आला आहे.