...तर मोदींनी व्यापाऱ्यांना घेऊन सीमेवर जावे : राज ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 08:00 PM2019-04-12T20:00:46+5:302019-04-12T20:15:13+5:30
गुजरातचे मुख्यमंत्री असताना माझ्यापुढे वेगळेच चित्र उभे केले
नांदेड : मोदींच्या मनात देशाच्या जवानांबद्दल आदर नाही, त्यांच्यापेक्षा व्यापाऱ्यांमध्ये अधिक साहस असते असे ते बोले आहेत. आता व्यापाऱ्यांना घेऊनच त्यांनी सीमेवर जावे असा टोला राज ठाकरे यांनी प्रधानमंत्री मोदींना लगावला.
मोदी आणि शहामुक्त भारतासाठी महाराष्ट्रभर सभा घेण्याचे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी जाहीर केले होते. त्यानुसार ठाकरे यांची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरील पहिली सभा नांदेड येथे होत आहे. तब्बल पाच वर्षांनंतर राज ठाकरे नांदेडकरांशी संवाद साधत आहेत. पुढे बोलताना ते म्हणाले, मोदी सतत इलेक्शन मोड मध्ये असतात. मात्र पाच वर्षात ते बोललेच खूप केलं काहीच नाही. मोदींच्या सभेत काळे कपडे घातलेल्या ना बाहेर काढले जाते, त्यांना एवढी भीती का आहे असा सवालही त्यांनी यावेळी केला.
जवानांच्या नावावर मते का मागत आहात
मोदी आता जवानांच्या नावावर मते का मागत आहेत, विकास कामावर का बोलत नाहीत. देशभरात लागू केलेल्या योजनांबद्दल ते आता बोलत नाहीत, नोटबंदी नंतर 5 कोटींचा रोजगार गेला, परंतु हे सर्व विषय सोडून दिलेत, मी बोललो होतो निवडणूक जवळ आली की मोदी युध्द सदृश परिस्थिती निर्माण करतील, मोदीला पर्याय राहणार नाही अन तसेच झाले.
मोदींनी केसाने गळा कापला
ज्या माणसावर आपण विश्वास टाकला, त्याने केसाने गळा कापला. देशातील लोकांना जी स्वप्न दाखविण्यात आली ती खोटी होती, गुजरातचे मुख्यमंत्री असताना माझ्यापुढे वेगळेच चित्र उभे केले होते अन आता वेगळाच माणूस समोर दिसतोय अशी घणाघाती टीका राज ठाकरे यांनी प्रधानमंत्री मोदी यांच्यावर केली.