पुलवामा हल्ला झाला तेव्हा मोदी- योगी भाषण देत होती - छगन भुजबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 08:30 PM2019-02-20T20:30:26+5:302019-02-20T20:43:23+5:30
राफेलच्या चौकशीने 56 इंच ची छाती थरारली असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
नांदेड : पुलवामा येथील दहशतवादी हल्ला ही घटना गंभीर आहे. त्यावेळी प्रियंका यांची पहिली प्रेस होणार होती, त्यांनी ती रद्द केली. मात्र, त्याचवेळी मोदी, योगी अन शहा वेगवेगळ्या ठिकाणी भाषणे करीत होते, तर मुख्यमंत्री युतीची वाटाघाटी करीत होते. आता यामध्ये समजदार कोण ? अशी खरमरीत टीका राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आज येथे केली
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांच्या महाआघाडीच्या प्रचाराचा प्रारंभ आज नांदेड येथून होत आहे. या निमित्ताने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत शहरातील इंदिरा गांधी मैदानावर संयुक्त सभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी बोलताना भुजबळ म्हणाले, भाजपने सत्तेत येण्यापूर्वी लाहोरपर्यंत घुसणार, अशा घोषणा केल्या होत्या, त्यावेळी ते तत्कालीन सरकारवर टीका करत. याउलट पुलवामा हल्ल्यानंतर राहूल गांधी यांनी आम्ही सर्व देशासोबत आहेत असे सांगितले. ही घटना गंभीर आहे. त्यावेळी प्रियंका यांची पहिली प्रेस होणार होती, त्यांनी ती रद्द केली. मात्र, त्याचवेळी मोदी, योगी अन शहा वेगवेगळ्या ठिकाणी भाषणे करीत होते, तर मुख्यमंत्री युतीची वाटाघाटी करीत होते. आता यामध्ये समजदार कोण ? अशी खरमरीत टीका यावेळी भुजबळ यांनी केली.
राफेलने '५६ इंची' छाती थरथरली
मोदींच्या विरोधात बोलणाऱ्या पत्रकारांना बाहेरचा रास्ता दाखविण्यात येत आहे. सरकारने सर्व स्वायत्त संस्था मोडीत काढल्या, सीबीआयची मुस्कटदाबी केली असून देशात हुकूमशाही सुरू आहे. मोदी हे, 'आम आदमी से मन की बात अन अंबानी से धन की बात' करतात. राफेलच्या चौकशीने 56 इंच ची छाती थरारली असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.