नांदेड जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाचा महावितरणला दोन कोटींचा ‘शॉक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 04:33 PM2018-05-30T16:33:07+5:302018-05-30T16:33:07+5:30
नांदेड ग्रामीण, भोकर तसेच देगलूर विभागात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. महावितरणच्या देगलूर, ग्रामीण विभागासह भोकर विभागातील विविध ठिकाणी महावितरणचे मोठे नुकसान झाले.
नांदेड : नांदेड ग्रामीण, भोकर तसेच देगलूर विभागात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. महावितरणच्या देगलूर, ग्रामीण विभागासह भोकर विभागातील विविध ठिकाणी महावितरणचे मोठे नुकसान झाले. यामध्ये सर्वाधिक फटका हा भोकर विभागाला बसला आहे.
भोकर विभागातील हदगाव, किनवट व माहूर परिसरात उच्चदाब वीज वाहिन्यांचे तब्बल १५१ विद्युत खांब, लघूदाब वाहिनीचे ६२१ खांब उद्ध्वस्त झाले. तर उच्चदाब आणि लघूदाब अशी ४२.९८ किमी. ची वीजवाहिनी तुटून पडली. तसेच २१ रोहित्र कोलमडून पडली. विशेष म्हणजे एकट्या भोकर विभागात एक कोटी ७२ लाख तर नांदेड ग्रामीण विभागात २१ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे लोहा, कंधारसह विविध परिसरात उच्चदाब वाहिनीचे ४४, लघूदाब वाहिनीचे १२३ पोल उद्ध्वस्त झाले. तर १० किमी.ची उच्चदाब व ३० किमी.ची लघुदाब वीजवाहिनी तुटून पडली. तसेच १४ रोहित्रांमध्ये बिघाड झाला. तर देगलूर भागात उच्चदाब वाहिनीचे १५, लघुदाब वाहिनीचे १९ पोल जमिनदोस्त झाले. त्यामुळे शहरी भागातील वीज ग्राहकांना १० ते १५ तास तर ग्रामीण भागातील ग्राहकांना ३० तास वीजपुरवठ्यापासून वंचित रहावे लागले. दरम्यान, काही ठिकाणी वीज दुरूस्तीचे काम अजूनही केले जात असल्याची माहिती आहे.
शनिवारी रात्री जिल्ह्यातील बहुतांश भागात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे उच्चदाब व लघुदाब वीज वाहिन्यांच्या पोलसह रोहित्रांचे नुकसान होऊन महावितरणचे जवळपास १ कोटी ९५ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. नांदेड जिल्ह्यातील अनेक भागांत २६ मे रोजी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या वादळी वाऱ्यामुळे ९७३ विद्युत खांब जमीनदोस्त झाले. तर १२३ लोखंडी खांब बुडापासून वाकले असून ८२ किलोमीटर विजेच्या तारा तुटून पडल्याने अनेक गावांमध्ये अजूनही अंधार पसरलेला असून विद्युत दुरूस्तींची कामे केली जात आहेत.
पावसाळयामध्ये वीजग्राहकांना अखंडित व योग्य दाबाने अखंडित वीजपुरवठा मिळावा, यासाठी महावितरणच्या वतीने पावसाळ्यापूर्वी देखभाल दुरूस्तीची कामे हाती घेण्यात आली होती. यामध्ये रोहित्राची तपासणी, त्याचे अर्थिंग व टर्मिनल कनेक्शन चेक करणे, आॅईलची पातळी कायम ठेवणे, फिडर पिलरची दुरुस्ती करणे, वीजतारांजवळील झाडांच्या फांद्याची छटाई, डिस्ट्रीब्युशन बॉक्समधील फ्यूज बदलविणे, खांब आणि तारांचे मजबुतीकरण,गंजलेले वीजखांब बदलणे, वीजतारांमध्ये स्पेसर्स बसविणे, स्टेवायरने वीजखांबांचा आधार मजबूत करणे, फुटलेले इन्सूलेटर बदलणे, तारा बदलणे किंवा झोल काढणे आदी कामांचा समावेश आहे.
धर्माबाद तालुक्यातील दहा गावे, तीन दिवसांपासून अंधारात
तालुक्यातील बाभळी(ध), सिरसखोड, नेरली, आल्लुर, बेल्लुर (बु), बेल्लुर (खु), नायगाव (ध), चिंचोली, जाफलापूर, शरिफाबाद या दहा गावात गेल्या तीन दिवसापासून लाईट नसल्याने अंधारात आहे. परिणामी पिण्याचे पाणी धर्माबाद येथून विकत आणावे लागत आहे. साडंपाणी नसल्याने स्नान करणे तर बंदच पण जनावरांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गावातील पिठाच्या गिरणी बंद पडल्याने धर्माबाद येथून पीठ दळून आणावे लागत आहे. रात्रीच्या वेळी विंचू किड्याची भीती निर्माण झाली असून डासाने नागरिक त्रस्त झाले आहेत.