महापालिका मुख्यालयातच २० टक्क्यांहून अधिक कर्मचारी मास्कविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:24 AM2021-02-26T04:24:19+5:302021-02-26T04:24:19+5:30
कोरोना प्रादुर्भावात दिवसेंदिवस वाढ होत आहे. दुसऱ्या लाटेची भीती व्यक्त होत असताना आता खबरदारीच्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. ...
कोरोना प्रादुर्भावात दिवसेंदिवस वाढ होत आहे. दुसऱ्या लाटेची भीती व्यक्त होत असताना आता खबरदारीच्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात कोरोना नियमावलीचे पालन नागरिकांकडून होते की नाही, याची पाहणी केली जात आहे. त्यात कोरोनाविरूध्दची त्रिसूत्री महत्त्वाची बाब आहे. मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझर्सचा वापर महत्त्वाचा आहे. कोरोना नियमावलींचे उल्लंघन करणाऱ्यांविरूध्द शहरात दोन दिवस कारवाईचा बडगा उगारला होता. त्यात दोन लाखांहून अधिक दंड आकारण्यात आला. महापालिकेच्या क्षेत्रिय कार्यालयांची पथके रस्त्यावर आली होती. या पथकांमाफर्त दंड आकारणी केली. मात्र, गुरुवारी महापालिकेच्या मुख्यालयात २० टक्क्यांहून अधिक कर्मचारी हे मास्कविनाच आपला कारभार पाहात होते. त्यात कामानिमित्त आलेले नागरिकही मास्कचा वापर कमी अधिक प्रमाणात करीत होते. मात्र, जी यंत्रणा नागरिकांना शिस्त लावण्यासाठी रस्त्यावर येते, त्याच महापालिकेच्या कार्यालयातील कर्मचारी मास्कचा वापर करीत नसल्याने कोरोनाचा फैलाव थांबणार कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नियमावलींचे पालन हवेच : आयुक्त
महापालिका कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोना नियमावलीचे पालन करण्याचे आदेश दिले आहेतच. त्यात निष्काळजीपणा होत असला तर विभागप्रमुखांना त्याबाबत सूचना दिल्या आहेत. आदेश, सूचनांपेक्षा प्रत्येकाने स्वत:साठी आणि आपल्या कुटुंबियांसाठी कोरोना नियमावलींचे पालन करणे आवश्यक आहे.
- डॉ. सुनील लहाने, आयुक्त