नांदेडात पीएफआयचे आणखी सदस्य पोलिस आणि एटीएसच्या रडारवर
By शिवराज बिचेवार | Published: September 23, 2022 05:14 PM2022-09-23T17:14:26+5:302022-09-23T17:14:46+5:30
न्यायालयाबाहेर हे आरोपी पडताच बाहेर एटीएस गो बॅकच्या घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे यंत्रणा अलर्टवर
नांदेड- टेरर फंडींग प्रकरणात एनआयए आणि एटीएसने गुरुवारी एकाच दिवशी देशभरात पापुलर फ्रंट ऑफ इंडीयाच्या पदाधिकाऱ्यांची धरपकड केली. या कारवाईत नांदेडातून एक आणि परभणीतील चार जणांना पकडण्यात आले. न्यायालयाने त्यांना ३० सप्टेंबर पर्यंत कोठडी सुनावली आहे. परंतु न्यायालयाबाहेर हे आरोपी पडताच बाहेर एटीएस गो बॅकच्या घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे यंत्रणा अलर्टवर असून पीएफआयचे आणखी सदस्य रडारवर असल्याची माहिती हाती आली आहे.
नांदेड जिल्हा हा तसा पूर्वीचा सिमीचा गड होता. २००१ मध्ये या संघटनेवर देश विघातक कारवायामधील सहभागामुळे बंदी आणण्यात आली. त्यानंतर सिमीचे अनेक सदस्यांनी इतर संघटनांचा आश्रय घेतला. १९९९ मध्ये नांदेड शहरातील शारदा टॉकीजमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. आजम घौरी याच्या इंडीयन मुजाहिदीन या संघटनेने तो बॉम्बस्फोट घडवून आणला होता. त्याचबरोबर कामारेड्डी येथील सुधा टॉकीजमध्येही अशाचप्रकारे स्फोट झाला होता. या टॉकीजमध्ये अश्लील चित्रपट दाखवित असल्यामुळे स्फोट केल्याचे पकडलेल्या आरोपींनी सांगितले होते.
तत्कालीन पोलिस अधीक्षक लक्ष्मीनारायण यांनी या संघटनेची जिल्ह्यातील पाळेमुळे खणून काढली होती.
तसेच सिमीचे भोकर, अर्धापूर, धर्माबाद येथील सर्व नेटवर्क तोडले होते. विशेष म्हणजे घौरी याने धर्माबाद येथे लपवून ठेवलेला मोठा शस्त्रसाठा त्यावेळी लक्ष्मीनारायण यांनी जप्त केला होता. त्यांच्याच काळात कारवाईच्या भितीने सिमीचे कार्यकर्ते भूमिगत झाले होते. त्यानंतर अनेक दिवस जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडला नव्हता. आता पापुलर फ्रंट ऑफ इंडीयावर केलेल्या कारवाईनंतर काही राज्यात हिंसक पडसाद उमटले आहेत. त्यामुळे नांदेडात पोलिस, एटीएस आणि गुप्तवार्ता विभाग अलर्टवर आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे.