धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर

By श्रीनिवास भोसले | Published: September 28, 2024 05:03 AM2024-09-28T05:03:24+5:302024-09-28T05:05:11+5:30

नेरली येथील घटना : मध्यरात्रीपासून आरोग्य यंत्रणा गावात तळ ठोकून

More than two hundred people poisoned by water in Nanded | धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर

धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर

नांदेड : तालुक्यातील नेरली कुष्ठधाम येथे पिण्याच्या पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा झाली असून त्यातील सहा जणांची प्रकृती गंभीर आहे.  ही धक्कादायक घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. उलट्यासह चक्कर येणे आणि डोकेदुखी होऊ लागल्याने शुक्रवारी मध्यरात्रीपासून शेकडो रुग्णांना रुग्णालयात भरती करण्यात येत आहे. ही विषबाधा सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या टाकीतील पाणी प्यायल्यामुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.

नांदेडपासून जवळच असलेल्या नेरली कुष्ठधाम येथे शुक्रवारी मध्यरात्री गावातील काही महिला आणि पुरुषांना उलटी जुलाब होणे, डोके दुखणे, चक्कर येणे असा प्रकार होत असल्याने शुक्रवार २७ सप्टेंबर रोजी रात्री साडेबारा वाजल्‍यापासून रुग्णांना  नांदेड शहरातील खासगी आणि शासकीय रुग्णालयात केले जात आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख यांनी डॉक्टरांच्या टीमसह नेरली कुष्ठधाम येथे धाव घेतली. रात्रीपासून आरोग्य पथक गावात तळ ठोकून असून गावातील अस्वस्थ रुग्णांची तपासणी करून त्यांना पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठविले जात आहे. शनिवार पहाटे चार वाजेपर्यंत जवळपास पावणे दोनशे रुग्णांना नांदेडच्या शासकीय आणि खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. यामध्ये पंधराहून अधिक लहान मुलांचा समावेश आहे.

सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल पावडे यांना हा प्रकार माहिती झाल्यानंतर त्यांनी तात्काळ गावात धाव घेत आरोग्य यंत्रणा तसेच प्रशासनाशी संपर्क साधून ही माहिती दिली. प्रारंभी पावडे यांच्याच गाडीतून दहा ते बारा रुग्णांना नांदेडच्या रुग्णालयात हलविण्यात आले. रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यांनी तात्काळ दोन खाजगी रुग्णवाहिका बोलविल्या. तद्नंतर गावात दाखल झालेल्या आरोग्य पथकासोबतच्या रुग्णवाहिकांतून गावातील रुग्णांना नांदेड येथे हलविण्यात येत आहे. सात रुग्णवाहिका आणि मिळेल त्या वाहनांनी रुग्णांना नांदेड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान हा प्रकार माहित झाल्यानंतर भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेंडगे आणि त्यांच्या टीमने देखील गावात धाव घेतली आहे. 

सहा जणांची प्रकृती गंभीर

पाण्यातून विषबाधा झाल्याचा संशय आहे. उलटी जुलाब आणि डोकेदुखी चक्कर येणे अशी लक्षणे आढळून येत असलेल्या रुग्णात वाढ होत आहे. त्यात सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. त्यांच्यावर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जिल्हाधिकारी राऊत लक्ष ठेवून 

नेरली कुष्ठधाम येथे विषबाधा झाल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ आरोग्य यंत्रणेला सूचना दिल्या. मध्यरात्री एक वाजेपासून जिल्हाधिकारी राऊत स्वतः आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून गावातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.  

नई आबादीतील रुग्ण सर्वाधिक

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगीता देशमुख आणि त्यांच्या टीमकडून गावातच आरोग्य केंद्रात रुग्णांची तपासणी केली जात आहे.  200 हून अधिक रुग्णांना नांदेड येथे पाठवण्यात आले. यामध्ये सर्वाधिक रुग्णही निर्णय येथील नई आबादी भागातील असल्याचे समजते. या भागात पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीतून विषबाधा झाली असावी असा अंदाज देखील वर्तविला जात आहे.

Web Title: More than two hundred people poisoned by water in Nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.