मॉर्निंग वाॅक आरोग्यासाठी की कोरोना घरात आणण्यासाठी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:17 AM2021-05-22T04:17:06+5:302021-05-22T04:17:06+5:30
नांदेड जिल्ह्यात मागील दोन महिन्यांत कोरोनाचा कहर सर्वांनी अनुभवला आहे. कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण होते. ...
नांदेड जिल्ह्यात मागील दोन महिन्यांत कोरोनाचा कहर सर्वांनी अनुभवला आहे. कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण होते. मागील आठवड्यापासून कोरोना रुग्णांच्या संख्येतील घसरण सुरू झाली असली तरी कोरोनाचे संकट अद्याप टळले नाही. जिल्ह्यात सर्वत्र लॉकडाऊन आहे. प्रशासन कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र दुसरीकडे नागरिकांची बेफिकिरीही दिसून येत आहे. विनाकारण घराबाहेर पडू नका, असे प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येत आहे. मात्र याकडे अनेकजण दुर्लक्ष करीत आहेत. काहीही काम नसताना बरेचजण विरंगुळा म्हणून घराबाहेर पडत आहेत. तसेच काहीजण मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडत आहेत. शहरातील मालेगावरोड, चैतन्यनगर विमानतळ रोड, कॅनॉल रोड, पूर्णा रोड या रस्त्यावर नागरिक मोठ्या प्रमाणात मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेले दिसत आहेत.
एकीकडे आरोग्य चांगले राखण्यासाठी लोक घराबाहेर पडत असले तरी दुसरीकडे बाहेरून येताना घरामध्ये कोरोना घेऊन येत आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती कायम आहे. मागील काही दिवसांत संपूर्ण कुटुंबेच कुटुंबे बाधित आढळून आली आहेत. मॉर्निंग वॉकला घराबाहेर पडण्यापेक्षा घरातल्या घरात किंवा गच्चीवर योगासने, व्यायाम करणे गरजेचे आहे. मात्र तरीसुद्धा अनेकजण जीव धोक्यात घालून मॉर्निंग वॉकला घराबाहेर पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. युवक, युवती, ज्येष्ठ नागरिक यांचा मॉर्निंग वॉकमध्ये सहभाग आहे. काहीजण चालताना तोंडावरचा मास्क हनुवटीवर आणत असून काहीजण रुमाल गुंडाळून येत आहेत; तर काहींच्या तोंडावर मास्कही नसतो. त्यामुळे पहाटेचे फिरणे आरोग्यासाठी नव्हे तर कोरोना घरात आणण्यासाठी कारणीभूत ठरत आहे.
चौकट- कोरोनाची भीती वाटत नाही का?
१. मागील काही दिवस मॉर्निंक वॉकसाठी घराबाहेर पडत नव्हतो. मात्र आता कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असल्याने या आठवड्यापासून पहाटे फिरण्यासाठी जात आहे. सुरक्षित अंतर ठेवून व तोंडाला मास्क लावूनच घराबाहेर पडत आहे. त्यामुळे कोरोनाची भीती वाटत नाही.
- रमेश कदम, तरोडा खु.
२. कोरोनाच्या भीतीमुळे अनेक दिवसांपासून घरातच बसून आहे. बाहेर फिरण्याची सवयही आता मोडली आहे. त्यामुळे कधी-कधी काही अंतरापर्यंत चालत जाऊन मोकळी हवा घेण्याच्या उद्देशाने बाहेर पडत आहे. कोरोनाची भीती कायमच आहे. त्यामुळे स्वत:ची काळजी घेऊनच बाहेर जात आहे.
- प्रा. सदाशिव भुयारे, वर्कशॉप कॉर्नर.
चौकट-
खुली हवा नव्हे, कोरोनाचे विषाणू
१. अनेकजण मॉर्निंक वॉकसाठी जाताना मोकळी हवा असते म्हणून बाहेर पडत आहेत. मात्र याच हवेमध्ये कोरोनाचे विषाणू असण्याची शक्यता असते. सध्या हवेमधूनही कोरोनाचे विषाणू पसरत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे खुली हवा घेण्याच्या नादात घरामध्ये येताना कोरोना विषाणू तर घरी घेऊन येणार नाही ना, याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे.
पोलिसांकडून किरकोळ कारवाई
चौकट-
मार्च महिन्यापासून सुरू झालेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने प्रत्येक घराला कवेत घेतले. त्यामुळे कोरोनाच्या भीतीने नागरिकांचा थरकाप उडाला होता. मात्र आता कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असल्याने नागरिक पुन्हा बिनधास्त झाले आहेत. लॉकडाऊनच्या काळात सुरुवातीला पोलिसांकडून मॉर्निंक वॉकला जाणाऱ्या नागरिकांवर किरकोळ कारवाई केली होती. मात्र आता याकडे कोणाचेही लक्ष नाही.