राज्यात सर्वाधिक महाग पेट्रोल धर्माबाद, उमरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 01:00 AM2018-09-18T01:00:20+5:302018-09-18T01:00:57+5:30
परभणीला मागे टाकत धर्माबादने राज्यात इंधन दरवाढीत प्रथम क्रमांक पटकाविला आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : देशभरात इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे़ पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दररोज वाढत आहेत़ राज्यात पेट्रोल-डिझेलचे सर्वाधिक दर हे परभणीत असल्याचे बोलल्या जात होते़ परंतु परभणीला मागे टाकत धर्माबादने राज्यात इंधन दरवाढीत प्रथम क्रमांक पटकाविला आहे़ धर्माबादेत सोमवारी पेट्रोलचा दर ९२़१९ रुपये तर डिझेल ८२़८९ रुपये प्रति लिटर दराने विक्री केले जात होते़ त्या खालोखाल उमरीचा क्रमांक लागतो़
गत सव्वा महिन्यात नांदेडात पेट्रोल तब्बल सहा रुपयांनी वाढले आहे़ त्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे़ दररोज पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ सुरु असून येत्या काही दिवसात पेट्रोल शंभरी गाठेल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे़ १ आॅगस्टला नांदेड शहरात पेट्रोलचा दर ८५़२८ पैसे तर डिझेल ७२़३९ पैसे प्रति लिटर होते़
१५ आॅगस्टला त्यामध्ये वाढ होवून पेट्रोल ८६़१८, डिझेल ७३़४१ पैशावर गेले होते़ ७ सप्टेंबरला पेट्रोल ८८़९७ तर डिझेल ७६़८८ पैसे होते़ १४ सप्टेंबरला पेट्रोल ९०़२३, डिझेल ७८़१५ पैसे लिटर होते़ राज्यात परभणीमध्ये सर्वाधिक महाग पेट्रोल-डिझेल मिळत असल्याचे बोलल्या जात होते़ परंतु परभणीपेक्षाही धर्माबाद आणि उमरी येथे अधिक दराने पेट्रोल आणि डिझेलची विक्री करण्यात येत आहे़ सोमवारी परभणीत पेट्रोल ९१़२८ पैसे तर डिझेल ७८़९० पैसे प्रति लिटर होते़
तर धर्माबादमध्ये पेट्रोल ९२़१९, डिझेल ८२़८९ रुपये प्रति लिटर होते़ म्हणजेच परभणीपेक्षा पेट्रोल जवळपास एक रुपया तर डिझेल तब्बल चार रुपयांनी महाग विकल्या जात होते़ तर उमरीमध्ये पेट्रोल ९१़८९ पैसे तर डिझेल ७९़४९ पैसे प्रति लिटर होते़ त्यामुळे परभणीपेक्षा धर्माबाद आणि उमरी येथे इंधनाचे दर जास्त आहेत़
तर नांदेडात सोमवारी पेट्रोल ९१ रुपये व डिझेल ७८़६५ पैसे प्रति लिटर होते़ येत्या काही दिवसात पेट्रोल शंभरी गाठणार असल्याचा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे़ साधारणता जुलै महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्यास सुरुवात झाली होती़ १२ आणि १३ सप्टेंबर असे दोन दिवस दर स्थिर होते़ त्यानंतर पुन्हा एकदा दरवाढीस सुरुवात झाली़
इंधनासाठी नागरिकांना आता जादा पैसे मोजावे लागणार आहेत़ खाजगी वाहतुकीचे दरही वाढविण्यात आले आहेत़ त्यामुळे जीवनाश्यक वस्तुच्या वाहतुकीच्या भाड्यात वाढ करण्यात आली आहे़ सध्या तरी, इंधन दरवाढीपासून दिलासा मिळण्याची शक्यता कमी असून सर्वसामान्यांमधून मात्र संताप व्यक्त करण्यात येत आहे़
मनमाडहून होतो धर्माबादला इंधन पुरवठा
नांदेड जिल्ह्यात सोलापूर, मनमाड आणि अकोला या तीन ठिकाणाहून पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा करण्यात येतो़ नांदेड शहरात सोलापूरहून तर धर्माबाद, उमरी, कारेगांव आदी भागांना मनमाडहून पेट्रोल-डिझेल पुरवठा करण्यात येतो़ त्यामुळे नांदेडपेक्षाही धर्माबाद, उमरी येथील पेट्रोल आणि डिझेलचे दर अधिक आहेत़ मनमाड ते धर्माबाद आणि उमरीचे अंतर परभणीपेक्षा जास्त आहे़ त्यात शेजारील तेलंगणामध्ये मात्र पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी असल्याची माहिती हाती आली आहे़
दरवाढीमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले
इंधन दरवाढीपासून सध्या तरी, सामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे़ त्यात भाजीपाल्याचे दर ३० ते ४० टक्क्यांनी वाढले आहेत़ गॅस सिलेंडरमध्येही दरवाढ झाली आहे़ खाजगी वाहतुकदारांनीही तिकीट दरात वाढ केली़ यासोबतच जीवनाश्यक वस्तुचे दर आवाक्याच्या बाहेर गेल्याने बजेट कोलमडले आहे़