मराठवाडयात दुष्काळ, सिंचन सुविधांअभावी सर्वाधिक शेतकरी आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 12:55 PM2019-12-24T12:55:33+5:302019-12-24T12:59:35+5:30

मराठवाड्यातील शेती कोरडवाहू असल्याने शेतकऱ्यांची मदार ही पूर्णपणे पावसावर असते.

Most farmers commit suicide due to drought, irrigation facilities in Marathwada | मराठवाडयात दुष्काळ, सिंचन सुविधांअभावी सर्वाधिक शेतकरी आत्महत्या

मराठवाडयात दुष्काळ, सिंचन सुविधांअभावी सर्वाधिक शेतकरी आत्महत्या

googlenewsNext
ठळक मुद्देअलीकडील काळात मराठवाड्याला अतिवृष्टीचा सामनाही सातत्याने करावा लागत आहे.

- विशाल सोनटक्के

परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या प्राध्यापक आर. डी. अहिरे आणि पी. एस. कापसे यांनी मराठवाड्यातील या ३२० आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील सदस्यांशी संवाद साधला. या संवादानंतर आणि अभ्यासातून त्यांनी शेतकरी आत्महत्या मागील कारणे मांडली आहेत.

सिंचऩ, शेतीपूरक व्यवसायांच्या अभावामुळेच मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या

मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्येची विविध कारणे असले तरी सततचा दुष्काळ आणि सिंचन सुविधांचा आभाव ही यामागची प्रमुख कारणे असल्याचे दिसते. याच कारणामुळे मराठवाड्यात तब्बल ८७.१८ टक्के शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे हा अहवाल सांगतो. 

मराठवाड्यातील शेती कोरडवाहू असल्याने शेतकऱ्यांची मदार ही पूर्णपणे पावसावर असते. मात्र, मराठवाड्यात अनेकवेळा सरासरीच्या तुलनेत अत्यल्प पाऊस पडतो. पर्यायाने अनेकदा पेरण्याच होत नाहीत. मात्र, त्यापूर्वीच शेतकऱ्यांने खते बी-बियाणे खरेदी केलेली असतात. शेती पिकणार नाही, मग वर्ष कसे काढायाचे? या चिंतेतून शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतो. याच प्रमुख कारणामुळे मराठवाड्यात तब्बल ८७.१८ टक्के आत्महत्या झाल्याचे दिसून येते. यामध्ये परभणी जिल्ह्यात ८५ टक्के, हिंगोली- ९५ टक्के, नांदेड- ९५ टक्के, बीड- ९२.५०, उस्मानाबाद- ९७.५०, लातूर- ५७.५०, औरंगाबाद- ७५ टक्के तर जालना जिल्ह्यातील सर्व १०० टक्के आत्महत्या या दुष्काळ आणि सिंचनसुविधेच्या अभावामुळे झाल्याचे या अहवालात म्हटले आहे.

अलीकडील काळात मराठवाड्याला अतिवृष्टीचा सामनाही सातत्याने करावा लागत आहे. अशा नैसर्गिक आपत्तीमुळे ५.६२ टक्के आत्महत्या झाल्या आहेत. पिकावर पडणाऱ्या रोगराई व  किडीच्या प्रादुर्भावामुळे ०.९३ टक्के आत्महत्या झाल्या. बोगस तसेच निकृष्ट बी-बियाणे, खते शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचा प्रयत्न होतो. अशा खते व बी-बियाणांमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान होते. अशा नुकसानीमुळे ०.६२ टक्के आत्महत्या झाल्या आहेत.  अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीतून २.८१ टक्के आत्महत्या झाल्या आहेत. कर्ज काढून विहीर खोदली, पण पाणी न लागल्याने ३.१२ टक्के शेतकरी आत्महत्या झाल्याचे या अभ्यासातून पुढे आले आहे.

सामाजिक आणि इतर कारणे
सहा आत्महत्या या मुलीच्या विवाहात दिलेल्या हुंड्यामुळे डोक्यावर कर्जाचा बोजा चढल्यामुळे झाल्या. यात औरंगाबाद जिल्ह्यातील चार आणि बीड जिल्ह्यातील दोन आत्महत्यांचा समावेश आहे. सर्वाधिक १७० आत्महत्या या शेतीच्या नापिकीमुळे आर्थिक आणि सामाजिक प्रतिष्ठा घसरल्याने झाल्याचे दिसते. यामध्ये परभणी, हिंगोली आणि बीड प्रत्येकी १८ आत्महत्या, नांदेड- १२, जालना- १६, उस्मानाबाद- २७, लातूर- ३७ आणि औरंगाबाद २४ शेतकरी आत्महत्यांचा समावेश आहे. ९७ शेतकरी आत्महत्या या उपवर मुली तसेच बहिणीच्या विवाहाच्या चिंतेतून झाल्याचेही धक्कादायक वास्तव या अभ्यासातून पुढे आले आहे.

कुटुंबातील सदस्य अथवा कुटुंब प्रमुखाच्या आत्महत्येच्या घटनेमुळे व्यथित होवून ६५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. ३१ आत्महत्या या शेजारी अथवा कुटुंबातील अंतर्गत वादाला कंटाळून झाल्या, तर १० आत्महत्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे व्यथित होऊन झाल्या आहेत. १०८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या या कुटुंबातील सदस्यांबरोबरच शेतकऱ्याने स्वत:च्या आजारपणाला कंटाळून केल्या असल्याचेही या अहवालात नमूद आहे.

Web Title: Most farmers commit suicide due to drought, irrigation facilities in Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.