बहुतांश रेल्वेगाड्या आता प्लॅटफार्म चारवरून धावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 01:55 PM2018-03-07T13:55:06+5:302018-03-07T14:02:38+5:30
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील रेल्वे कार्यालयाने प्रवासी तसेच लोकप्रतिनिधींची मागणी लक्षात घेऊन नांदेड स्थानकातून धावणार्या महत्त्वपूर्ण रेल्वेगाड्या प्लॅटफार्म क्रमांक ४ वरून सोडण्याचा निर्णय घेतला़
नांदेड : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील रेल्वे कार्यालयाने प्रवासी तसेच लोकप्रतिनिधींची मागणी लक्षात घेऊन नांदेड स्थानकातून धावणार्या महत्त्वपूर्ण रेल्वेगाड्या प्लॅटफार्म क्रमांक ४ वरून सोडण्याचा निर्णय घेतला़ यामध्ये एकूण सहा रेल्वेगाड्यांचा समावेश आहे़
नांदेड येथून मुंबईकडे धावणार्या गाड्या प्लॅटफार्म क्रमांक दोन आणि तीनवरून सोडण्यात येत असल्याने वृद्ध व्यक्ती, स्थानिक लोकप्रतिनिधी, रूग्णांना अडचणींचा सामना करावा लागत होता़ तसेच प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर येणार्या प्रवाशांना वजिराबाद चौरस्ता, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील वाहतूक कोंडीचा सामना करत स्थानक गाठावे लागते़ तसेच ऐन स्थानकासमोरून एसटी महामंडळाच्या बसेसदेखील धावत असल्याने येथील परिसरात नेहमीच वाहतूक कोंडी झालेली असते़ त्यामुळे वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांची गाडी सुटल्याच्या घटना अनेकवेळा घडल्या आहेत़ तर हीच अवस्था वृद्ध व्यक्ती, दिव्यांगांचीदेखील होती़ त्यामुळे नांदेडातून धावणार्या महत्त्वपूर्ण रेल्वे प्लॅटफॉर्म चारवरून सोडाव्यात, अशी मागणी माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण यांनी दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांसोबत झालेल्या खासदारांच्या बैठकीत केली होती़
लोकप्रतिनिधींची मागणी लक्षात घेऊन नांदेड रेल्वे प्रशासनाने ७ मार्चपासून काही गाड्यांचे प्लॅटफार्म बदलण्याचा निर्णय घेतला आहे़ यात सुपरफास्ट आणि एक्स्प्रेस गाड्यांचा समावेश आहे़ सदर गाड्या महत्त्वपूर्ण रेल्वे म्हणून ओळखल्या जातात़ यामध्ये सिकंदराबाद-मुंबई देवगिरी एक्स्प्रेस, नांदेड-तिरुपती एक्स्प्रेस, नगरसोल-नरसापूर एक्स्प्रेस, नांदेड-पनवेल एक्स्प्रेस, धर्माबाद-मनमाड मराठवाडा एक्स्प्रेस, पूर्णा -पाटना एक्स्प्रेस या गाड्यांचा समावेश आहे़ सदर गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वरून धावणार आहेत़ गोकुळनगर परिसरात वाहनांची गर्दी कमी असल्याने कमी वेळेत स्थानकात पोहोचणे शक्य होईल़
चव्हाणांचा पाठपुरावा
नांदेड स्थानकातील प्लॅटफार्म एकवर येणार्या प्रवाशांना वजिराबाद चौक, डॉ़बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो़ वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे अनेकवेळा प्रवाशांची गाडी सुटते़ त्यामुळे नांदेड स्थानकातून धावणार्या महत्त्वपूर्ण गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक चारवरून सोडाव्यात, अशी मागणी माजी मुख्यमंत्री खा़अशोकराव चव्हाण यांनी रेल्वे बोर्ड, दमरेचे महाव्यवस्थापक आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांच्याकडे सातत्याने केली़ दरम्यान, नांदेड विभागाने मंगळवारी वेळापत्रकात केलेल्या बदलामुळे खा़ चव्हाणांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.