सासू-सुनेच्या लढतीत सासूबाई विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:20 AM2021-01-19T04:20:39+5:302021-01-19T04:20:39+5:30
नांदेड - अर्धापूर तालुक्यातील दाभड येथील ग्रामपंचायत निवडणुकीत सासू आणि सुनेमध्ये थेट लढत झाली. या लढतीत सासूने बाजी मारत ...
नांदेड - अर्धापूर तालुक्यातील दाभड येथील ग्रामपंचायत निवडणुकीत सासू आणि सुनेमध्ये थेट लढत झाली. या लढतीत सासूने बाजी मारत सुनेचा केवळ चार मतांनी पराभव केला. एकाच कुटुंबातील सासू व सून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते. सोमवारी मतमोजणीअंती सासूबाई रेखाबाई राजेश दादसवार या २०२ मते मिळवत विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले. तर सूनबाई संगीताबाई दादसवार यांना १९८ मते मिळाली. अवघ्या चार मतांनी सासूने सुनेवर मात केली.
अर्धापूर तालुक्यातील अन्य मोठ्या ग्रामपंचायतींचे निकालही धक्कादायक लागले आहेत. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आपले गड राखले आहेत. येळेगावमध्ये माजी सभापती आनंद कपाटे, कोंढ्यात पप्पू पाटील कोंढेकर, खैरगाव येथे बालाजी गव्हाणे तर मालेगाव येथे स्थानिक विकास आघाडीला बहुमत मिळाले आहे. कामठामध्ये माजी सभापती मंगला स्वामी यांचा पराभव झाला. येथे रणजितसिंघ कामठेकर यांची १० वर्षानंतर सत्ता आली. त्यांच्या गटाला ९ तर स्वामी यांच्या गटाला ४ जागा मिळाल्या. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पप्पू कोंढेकर यांच्या गटाला कोंढ्यात आठ जागा मिळाल्या. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बालाजी गव्हाणे यांच्या गटाला चार, मालेगाव येथे स्थानिक आघाडीला ९, डॉ. लक्ष्मण इंगोले यांना ४ व नागोराव इंगोले यांना २ जागा मिळाल्या.
पिंपळगाव ग्रामपंचायतीमध्ये माजी सरपंच वसंतराव कल्याणकर यांच्या गटाला ६, तर बालाजी कल्याणकर यांच्या गटाला ५ जागा मिळाल्या. सावरगावमध्ये उद्धव आबादार यांच्या गटाला ९ जागा मिळाल्या. आंबेगावात अमोल डोंगरे, भोगावमध्ये काशीराव हाके, मेंढला खुर्दमध्ये दत्ता नवले यांना बहुमत मिळाले.