दुःखाचा डोंगर! अवघ्या आठवडाभरात आई, मुलगा आणि नातवाचा मृत्यू;नांदेड जिल्ह्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 02:17 PM2022-05-11T14:17:22+5:302022-05-11T14:22:57+5:30
नातवाच्या मृत्युच्या दिवशी आजीने तर दशक्रियेच्या दिवशी मुलाने सोडले प्राण
मनाठा (नांदेड): येथील एका तरुणाचा ह्रदयविकाराने मृत्यू झाल्यानंतर त्याच दिवशी आजीचे निधन झाले तर दशक्रिया विधीच्या दिवशी खचलेल्या वडिलांचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नामदेव नारायण वाठोरे असे वडिलांचे, राहुल असे मुलाचे तर कलाबाई असे मृत आजीचे नाव आहे.
याबाबत आधी माहिती अशी की, नामदेव वाठोरे यांची आर्थिक स्थिती जेमतेम आहे. त्यांची दोन्ही मुळे औरंगाबादला राहतात. मोठा मुलगा कचरू औरंगाबाद येथेच तर लहान राहुल जालना येथे पेंटिंगचे काम करत असे. बुधवारी ( दि .४ ) कामावर जाताना रेल्वेत राहुलचा हदयविकाराने मृत्यू झाला. राहुलचा मृतदेह अंत्यविधीसाठी गावी आणला त्याच दिवशी आजी कलाबाई यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. यामुळे आधीच आजारी असलेले नामदेव वाठोरे आणखी खचले.
दरम्यान, मंगळवारी ( दि. १० ) राहुलचा दशक्रिया विधी सुरु असताना वडील नामदेव यांचा मृत्यू झाला. आठवडाभरात घरातील ३ व्यक्तींचा मृत्यू झाल्याने वाठोरे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.