पाणीटंचाई गावांच्या कृती आराखड्यासाठी हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 12:57 AM2018-11-17T00:57:57+5:302018-11-17T00:58:42+5:30
यावर्षी तालुक्यात विशिष्ट पद्धतीने पाऊस होणे अपेक्षित होते. परंतु पावसाचा लहरीपणा आडवा आला. पावसाळ्यात जलसाठे वाढले नाहीत. आणि परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने पीक व जलसाठे वाढीला मदत मिळाली नाही.
कंधार : आगामी काळात पाणी टंचाईची समस्या ग्रामीण भागात डोकेदुखी ठरणार असे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य पाणीटंचाई गावात उपाययोजना करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यासाठी हालचालीना वेग आला आहे.
यावर्षी तालुक्यात विशिष्ट पद्धतीने पाऊस होणे अपेक्षित होते. परंतु पावसाचा लहरीपणा आडवा आला. पावसाळ्यात जलसाठे वाढले नाहीत. आणि परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने पीक व जलसाठे वाढीला मदत मिळाली नाही. त्यामुळे पाणीटंचाई प्रश्न जटील होणार. अशीच एकंदर स्थिती आहे. त्यामुळे जूनपर्यंत पाणी समस्या निवारण्यासाठी उपाययोजना करणारा कृती आराखडा तयार केला जाणार आहे. त्यासाठी बैठकीचे आयोजन केले जात आहे.
सप्टेंबर महिन्यात तीन टप्प्यात आराखडा तयार करण्याची सूचना गटविकास अधिकारी यांना होती. त्यात आॅक्टोबर ते डिसेंबर, जानेवारी ते मार्च व एप्रिल ते जून असा समावेश होता. आता डिसेंबर महिन्यात बैठक असल्याने दोन टप्पे होतील.कृती आराखडा तयार करताना तात्पुरती पूरक नळयोजना प्रस्तावित करताना गावात मुळ नळयोजना असायला हवी.
नळयोजना विशेष दुरूस्ती प्रस्तावित करताना मागील तीन वर्षात टंचाई अंतर्गत दुरूस्ती घेतलेली नाही. याची दक्षता घेणे गरजेचे आहे. नवीन विंधन विहीर घेताना त्या गावातील विंधन विहीर संख्या विचारात घ्यावी. जिथे विंधन विहीर खोदल्यास दुषित पाणी लागते तेथे प्रस्ताव करू नये. राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमातंर्गत मंजूर व प्रगतीपथावर योजना असलेल्या गावात नवीन विंधन विहीर, नळयोजना विशेष दुरूस्ती व पुरक नळयोजना अशा उपाययोजना प्रस्तावित न करता योजना पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करावा. एका गावासाठी एकच उपाययोजना प्रस्तावित करावी अशा सूचना व अटी असतात. याचे पालन करून आराखडा तयार केला जातो का? हे पहाणे तात्काळ मंजुरीसाठी महत्त्वाचे आहे. पाणीटंचाई आराखडा बैठकीवरून मागील कांही वर्षात राजकीय शहकाटशह होतात. मानपानाचे राजकारण रंगते. यावर्षी तरी तसे होणार नाही अशी अपेक्षा नागरिक करत आहेत. दरम्यान, तालुक्यात आतापासूनच पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर बनला आहे़
२१ नोव्हेंबर रोजी पूर्वतयारी बैठकीचे आयोजन
- २१ नोव्हेंबर रोजी गटविकास अधिकारी पूर्वतयारी बैठक घेणार असल्याचे समजते. त्यानंतर १ डिसेंबर रोजी आमदार प्रताप पा.चिखलीकर, सभापती सत्यभामाबाई देवकांबळे, उपसभापती भीमराव जायेभाये, जि.प.सदस्य, पं.स.सदस्य, अधिकारी, ग्रामसेवक, लोकप्रतिनिधी आदीच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. यात पाणी टंचाई निवारणार्थ कृती आराखडा दोन टप्प्यात केला जाणार आहे.
- पाणीटंचाई समस्या दूर करण्यासाठी जिल्हास्तरावरून कांही निर्देश असून त्यानुसार आराखडा केला जातो का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.दरम्यान, पाणी टंचाईचा प्रश्न आतापासूनच जटील बनल्याचे चित्र निर्माण झाले आहे़
- प्रस्ताव तयार करताना गावात मुळ नळ योजना आवश्यक
- कृती आराखडा तयार करताना तात्पुरती पूरक नळयोजना प्रस्तावित करताना गावात मुळ नळयोजना असायला हवी. नळयोजना विशेष दुरूस्ती प्रस्तावित करताना मागील तीन वर्षात टंचाई अंतर्गत दुरूस्ती घेतलेली नाही.