प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 12:29 AM2019-02-08T00:29:31+5:302019-02-08T00:31:05+5:30
शेतक-यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र सरकार पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली. लोहा तालुक्यात त्याच्या अंमलबजावणीस आरंभ झाला आहे.
लोहा : शेतक-यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र सरकार पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली. लोहा तालुक्यात त्याच्या अंमलबजावणीस आरंभ झाला आहे. त्याअंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतक-यांना प्रती शेतकरी कुटुंबाला वार्षिक सहा हजार रुपये इतके आर्थिक सहाय्य तीन टप्यात उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार विठ्ठल परळीकर यांनी दिली.
शेतक-यांसाठी असलेली कल्याणकारी योजनेची तात्काळ अंमलबजावणी व्हावी, यासाठी तहसीलदार परळीकर यांनी मंडळ अधिकारी, तलाठी यांची एक विशेष बैठक घेऊन त्यांना सदरील योजनेची माहिती दिली व त्याची गाव पातळीवर माहिती देऊन तात्काळ अंमलबजावणी करुन शेतक-यांना लाभ पोहचविण्याच्या सूचनाही तहसीलदारांनी दिल्या.
योजनेअंतर्गत प्रत्येक गावनिहाय खातेदार शेतक-यांची संगणीकृत यादी करण्यात येणार आहे. तसेच वनहक्क कायद्याअंतर्गत जिल्हा समितीने पात्र केलेल्या शेतकरी कुटूंबाचाही सदरील योजनेत समावेश करण्यात येण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ज्या कुटुंबाचे सर्व विविध ठिकाणचे मिळून लागवडी योग्य एकूण कमाल धारण क्षेत्र दोन हेक्टरपर्यंत असेल त्यांना सदर योजना अनुज्ञेय आहे.
खातेदारांचे कुटूंबनिहाय वर्गीकरण केल्यानंतर ज्या कुटूंबाचे सर्व विविध ठिकाणचे मिळून लागवडी योग्य एकूण धारण क्षेत्र दोन हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा कुटुंबाची यादी तयार करण्यात येणार असून १ फेब्रूवारी २०१९ रोजी असलेले धारण क्षेत्र विचारात घेतले जाणार आहे.
सदर यादीत पात्र खातेदारांचे नाव, लिंग, जातीचा प्रवर्ग, आयएफसी कोडसह बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक, भ्रमणध्वनी क्रमांक आदी माहिती संकलित करण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे सदर योजनेत संवैधानिक पद धारण करणारे तसेच आजी, माजी राज्यसभा सदस्य, माजी खासदार, आजी राज्यमंत्री, माजीमंत्री विधानसभा, आजी माजी महानगर पालिकेचे महापौर, विधान परीषद सदस्य, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, केंद्र व राज्य शासनाचे अधिकारी, कर्मचारी, स्वायत्त संस्थाचे अधिकारी, मागील वर्षी आयकर भरलेले व्यक्ती, दहा हजार किंवा त्यापेक्षा जास्त निवृत्तीवेतनधारक व्यक्ती, नोंदणीकृत व्यवसायिक डॉक्टर, वकील, चार्टर्ड आकाऊटंट सनदी लेखापाल, आर्किटेक्ट इत्यादी क्षेत्रातील व्यक्ती लाभ मिळण्यासाठी पात्र असणार नाहीत.
या शेतक-यांना मिळणार नाही लाभ
या योजनेचा लाभ आजी-माजी आमदार, मंत्री, माजी महापौर, आजी-माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी, शासन अंगीकृत निमशासकीय संस्थेचे कर्मचारी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून, स्वराज्य संस्थेतील नियमित अधिकारी, मागील वर्षी आयकर भरलेले व्यक्ती, दहा हजार किंवा त्यापेक्षा अधिक निवृत्तीवेतन धारक व्यक्ती अशांना योजनेचा लाभ मिळणार नाही -महेश वडदकर, उपविभागीय अधिकारी, हदगाव़
प्रशासनाची बैठक
अर्धापूर : तालुक्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबविण्यासंदर्भात प्रशासन सरसावले आहे़ या अनुषंगाने तहसीलदार सुजीत नरहरे यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील सर्व ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तलाठी यांची बैठक आयोजित करण्यात आली़