विष्णुपूरीतील पाण्याच्या नियोजनासाठी हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 07:22 PM2019-09-04T19:22:55+5:302019-09-04T19:24:10+5:30
वेळापत्रकाचे योग्य नियोजन गरजेचे
नांदेड : गतवर्षी विष्णुपुरीतील पाण्याचे योग्य नियोजन न झाल्याने नांदेडकरांना १० ते १५ दिवसाआड पाणी मिळाले़ त्यातही डिग्रस बंधाऱ्यातून पाणी घ्यावे लागले़ त्यामुळे यंदा विष्णुपुरीच्या पाण्याच्या योग्य नियोजनासाठी जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली हालचालींना वेग आला आहे़ गोदावरीतील पाण्याचा येवा सध्या बंद झाल्याने विष्णुपूरीचा एकही दरवाजा उघडलेला नाही़ उपलब्ध पाणी इतर बंधाऱ्यात लिफ्ट करून वरील भागातून येणारे पाणी विष्णुपूरीतच रोखले जाणार आहे़
नांदेड शहराची तहान भागवणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात सलग दोन दिवस झालेल्या पावसामुळे विष्णुपूरी प्रकल्प तुडूंब भरला आहे़ त्याबरोबरच गोदावरी नदीवरील दिग्रस उच्च पातळी बंधारा आणि अंतेश्वर बंधाऱ्यातील जलसाठ्यातही लक्षणीय वाढ झाली असून या दोन्ही बंधाऱ्यावरील गेट सध्या बंद केल्याने विष्णुपूरीकडे येणाऱ्या पाण्याचा येवा बंद झाला आहे़ परंतु, सदर बंधारे भरल्यानंतर पुन्हा येवा सुरू होईल़ त्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने योग्य नियोजन करणे गरजेचे आहे़ गतवर्षी शहरात पाणी सोडणे, सिंचनासाठी पाणीपाळ्या आणि पाण्याची गळती रोखण्यासाठी योग्य उपाययोजना न केल्यामुळे नांदेडकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला़ गोदावरील डिग्रस उच्च पातळी बंधाऱ्यातून पाणी सोडल्यामुळे नांदेडकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला़ त्यातही नांदेड शहरात दहा ते पंधरा दिवसाला एकवेळ पाणी सोडले गेले़ काही भागात वीस वीस दिवस पाणी आले नाही़ परिणामी हजारो कुटुंबाना टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागले़ शहरवासियांचे कोट्यवधी रूपये पाण्यावर खर्च झाले़ सद्यस्थितीत पाण्याचे वेळापत्रक बदलण्याच्या हालचाली सुरू आहेत़
आजपासून सोनखेड, बाभुळगाव तलावात पाणी
सद्यस्थितीत नांदेड विभागातील जायकवाडी प्रकल्पात ८५़६७ टक्के, मांजलगाव प्रकल्पात शुन्य टक्के, ढालेगाव बंधारा-४४़८९ टक्के, येलदरी - निरंक, सिद्धेश्वर प्रकल्प-निरंक, मुडगळ बंधारा- ४३१९ टक्के, मुळी बंधारा- ९़४४ टक्के, दिग्रस - ६७़०३ टक्के, अंतेश्वर- ८१़७६ टक्के, शंकर चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प- १०० टक्के, अप्पर मानार प्रकल्प-१४़११ टक्के, लोअर मानार-५१़२७ टक्के, इसापूर प्रकल्प - १५़४३ टक्के, आमदुरा-६६़०८ टक्के, बळेगाव -७९़०८ टक्के, बाभळी- निरंक, निजामसागर-३़८५ टक्के, पोचमपाड - २५़७६ टक्के जलसाठा आहे़ विष्णुपूरी प्रकल्पातून आंध्रप्रदेशात वाहून जाणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन करून सदर पाणी लिफ्ट करून सोनखेड, डेरला, बाभुळगाव, किवळा, पांगरी येथील तलाव भरण्याच्या सूचना खा़हेमंत पाटील यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना केल्या होत्या़ त्यानूसार ४ सप्टेंबरपासून पंपद्वारे पाणी लिफ्ट करून सोनखेड, बाभुळगाव आदी तलावात सोडले जाणार आहे़