राजकारणासाठी खासदारांचा स्टंट, डीनला शौचालय साफ करायला लावल्याने उद्या काम बंद
By शिवराज बिचेवार | Published: October 3, 2023 03:42 PM2023-10-03T15:42:23+5:302023-10-03T15:42:52+5:30
संतप्त झालेल्या खासदार हेमंत पाटील यांनी अधीष्ठाता यांच्या हाती झाडू देत शौचालय साफ करण्यास भाग पाडले.
नांदेड - नांदेडच्या शासकीय रुग्णालयात २४ तासात २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणावरुन राजकारण तापले आहे. त्यातच मंगळवारी खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालयाची पाहणी करुन चक्क अधीष्ठातांना बालरोग कक्षातील शौचालय साफ करायला लावले. या प्रकरणाचे वैद्यकीय अभ्यासक्रमाला असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये तीव्र पडसाद उमटले आहेत. राजकारण राजकारणाच्या जागी करा, स्टंटबाजीला आमचा विरोध आहे, असे म्हणत या विद्यार्थ्यांनी बुधवारी काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
खासदार हेमंत पाटील यांनी दुपारी अधीष्ठाता डॉ. एस.आर. वाकोडे यांच्या कक्षात बैठक घेतल्यानंतर त्यांना घेवून ते रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी निघाले. यावेळी जागोजागी घाण, लिफ्ट बंद असे आढळून आले. त्यानंतर खासदार हे अधीष्ठाता यांना घेवून बालरोग कक्षात दाखल झाले. या ठिकाणी एका बेडवर दोन चिमुकल्यांवर उपचार सुरु असल्याचे दिसून आले. तसेच या कक्षातील चार शौचालय हे कुलूप बंद होते. तर उघड्या शौचालयात प्रचंड घाण होती. त्यामुळे संतप्त झालेल्या खासदार हेमंत पाटील यांनी अधीष्ठाता यांच्या हाती झाडू देत शौचालय साफ करण्यास भाग पाडले.
या प्रकरणाची माहिती युजी आणि पीजीच्या विद्यार्थ्यांना मिळाल्यानंतर दुपारी ३ वाजता ते विद्यार्थी अधीष्ठाता कार्यालयासमोर जमले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी रुग्णांच्या मृत्यूचे प्रकरण वेगळे आहे. परंतू केवळ राजकीय फायद्यासाठी खासदारांनी आमच्या प्रमुखांना शौचालय साफ करायला लावले, ही बाब निषेधार्ह असून याबाबत उद्या काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.