बीएसएनएलच्या नेटवर्क सेवेवर खासदार संतापले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:13 AM2021-07-08T04:13:46+5:302021-07-08T04:13:46+5:30
नांदेड शहरासह ग्रामीण भागातील सेवांवर परिणाम झाला आहे. आजघडीला विद्यार्थ्यांचे ऑनलाइन क्लास सुरू आहेत. त्याचबरोबर ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे पीकविमा ...
नांदेड शहरासह ग्रामीण भागातील सेवांवर परिणाम झाला आहे. आजघडीला विद्यार्थ्यांचे ऑनलाइन क्लास सुरू आहेत. त्याचबरोबर ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे पीकविमा भरण्याचे काम सुरू असून नेटवर्कच्या अडचणींमुळे विमा भरण्यास अडथळे निर्माण होत आहेत. खासगी कंपन्यांकडून एकासरस एक सुविधा दिल्या जात असताना बीएसएनएलच्या सेवेला मात्र मरगळ आली आहे. नांदेड जिल्ह्यात डेटालाइनचे ५६०, फायबर लाइनचे १४०० तर लॅण्डलाइन मिळून दहा हजारांच्या घरात ग्राहक संख्या आहेत; परंतु बीएसएनएलच्या सेवेला प्रत्येक ग्राहक वैतागला आहे. दरम्यान, यासंदर्भात वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन खासदार हेमंत पाटील यांनी हदगाव, माहूर, किनवट यासह इतर एक्स्चेंज कार्यालयातील असुविधांची पूर्तता करण्यात यावी याबाबत संबंधितांना निर्देश दिले. पीकविमा भरण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना नेटवर्क नसल्याने कित्येक तास ताटकळत बसावे लागत आहे. किनवट येथील मका ज्वारी खरेदी केंद्रावर सुद्धा हीच परिस्थिती असल्याने राज्य शासनाला दुबार ऑनलाइन अर्ज मागवावे लागले होते. आजघडीला पीकविमा भरण्याबरोबरच ऑनलाइन शिक्षणास बीएसएनएलच्या नेटवर्कमुळे अडचणी निर्माण होत असून त्या दूर करण्याच्या सूचना पाटील यांनी दिल्या. त्यांच्यासमवेत बीएसएनएलचे अधिकारी तसेच सेना पदाधिकारी उपस्थित होते.